
मराठी चित्रपटसृष्टीतले अभिनेते किरण माने हे राजकीय घडामोडीवर अनेकदा बिनधास्तपणे आपली भूमिका मांडत असतात. सद्य परिस्थितीत मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटलेला असून जालना येथील आंदोलन आपले उपोषण थांबवण्यास कुठल्याही परिस्थितीत तयार नाहीत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे शांततेत हे उपोषण सुरू आहे.
किरण माने यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिलेली असून त्यामध्ये मराठा बांधवांना आपला खरा शत्रू ओळखण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे. धर्माच्या नावावर आपल्याला भडकवण्यात येते . धर्म संकटात आला की आपली मदत घेतली जाते पण ज्यावेळी आपल्यावर हल्ला होतो तर तो हल्ला ‘ एका जातीवर ‘ झाला आहे असे सांगत मराठा बांधवांच्या डोळ्यात अंजन घालणारी एक पोस्ट सोशल मीडियात त्यांनी शेअर केलेली आहे .
किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की ?
माझ्या मराठा बांधवांनो… थेट बोलतो… आपल्याला धर्माच्या नांवावर भडकवणारेच आज आपल्या पाठीत खंजीर खुपसत हायेत. सावध होऊया. खरा शत्रू ओळखूया. आता तरी आपला खरा धर्म ओळखूया. धर्म संकटात आला की आपली मदत घेतली जाते आणि आपल्यावर हल्ला झाला की ‘एका जातीवर’ झाला असं समजलं जातं. आधी शेतकर्यांवर, मग वारकर्यांवर आनि आता या आंदोलनावर आघात झालाय. मराठा आरक्षण कुनाला नको हाय, ते शोधायला लै लांब नाय जावं लागनार. फक्त आपल्या धडावर आपलं डोकं असायला पायजे.
मनोज जरांगे पाटील…तुमच्याबद्दल काय बोलू ? या भाकड काळात तुमी जे बोलताय ते बोलायला जिगरा लागतो ! परवा आमच्या आयाबहिनींचं रक्त पाहिल्यापास्नं आमचंबी काळीज तुमच्याइतकंच तुटतंय… रक्त सळसळायला लागलंय… हात शिवशिवताहेत. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. फक्त सावध रहा. शत्रू कुटिल कारस्थानी आहे. सहकार्यांवर लक्ष ठेवा. आंदोलनात छुपी घुसखोरी करून आंदोलन हायजॅक करण्याचा इतिहास ताजा आहे. आता सावधपणे, भान ठेवून शेवटचा घाव घालूया सगळे मिळून. आता रस्त्यावर उतरायची वेळ आलीय.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की ‘एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन !’ अशा पोस्टवरनं जे कायम मला ट्रोल करतात त्यांना खरंतर मी एका केसाचीबी किंमत देत नाय. पन आज एक सांगतो, मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक हाय. कुनाच्या बापाला घाबरत नाय. काम काढून घेनन्याफिन्याला भेत नाय. मनगटाच्या बळावर मातीतनं पिकवून खानार्या शेतकर्याची औलाद हाय. कुनापुढं लाचार होनार नाय. समाजासाठी, गोरगरीबांसाठी आनि माझ्या शेतकर्यांसाठी वाट्टंल ती किंमत मोजून मी बोलनार. जीवात जीव असेपर्यन्त बोलत र्हानार. आंदोलनकर्त्या भावाबहिनींनो, तुमच्या रक्ताच्या सांडलेल्या एकेका थेंबाची किंमत वसूल झाली पायजे… न्याय मिळालाच पायजे. जय शिवराय. जय भीम.- किरण माने.