मराठा बांधवांची सरकारकडून ‘ अशी ‘ सुरु आहे दिशाभूल , वस्तुस्थिती पुराव्यासहित

शेअर करा

जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अद्यापही सुरू असून मराठा आरक्षणासाठी त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आता सुमारे बारा दिवस उलटले आहेत. उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आजपासून पाणी बंद करणार आहे त्याचसोबत डॉक्टरांनी जोडलेले सलाईन देखील काढून टाकणार आहेत. शासनाच्या जीआरमध्ये कुठलीही दुरुस्ती झालेली नाही आणि लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना अद्याप बडतर्फ केलेले नाही त्यामुळे आपले उपोषण आता अधिक तीव्र करण्यात येईल , असा इशारा त्यांनी दिलेला आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की शासन दरबारी ओबीसी कॅटेगिरीमध्ये ज्या व्यक्तींच्याकडे कास्ट सर्टिफिकेटवर ‘ कुणबी , लेवा कुणबी ,लेवा पाटील , लेवा पाटीदार आणि कुर्मी ‘ अशी नोंद आहे त्यांनाच जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राचा फायदा होतो. शासनाने दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी काढलेल्या जीआरमध्ये ( जीआर लिंक पहा ) केलेला उल्लेख हा केवळ कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या प्रमाणपत्रापुरताच मर्यादित असून फक्त आणि केवळ ‘ कुणबी ‘ हा शब्द आणि कुणबी प्रमाणपत्र असा उल्लेख केलेला नाही तर कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असा उल्लेख आहे.

कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ही दोनच प्रमाणपत्रे मराठवाड्यातील मराठा बांधवांना मिळू देखील शकतीलमात्र त्यामुळे सरकार दरबारी असलेल्या ओबीसी लिस्टप्रमाणे आवश्यक प्रमाणपत्र मराठा बांधवाना मिळणार नाही . सरकार दरबारी असलेल्या लिस्टमध्ये ‘ कुणबी , लेवा कुणबी ,लेवा पाटील , लेवा पाटीदार आणि कुर्मी ‘ याच जातींचा ( ओबीसी कॅटेगरी लिस्ट पहा ) ओबीसीमध्ये समावेश केलेला आहे त्यामुळे कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या जातीचे प्रमाणपत्र घेऊन देखील ओबीसीचे फायदे मिळू शकणार नाहीत .

दुसरे असे की जुन्या वंशावळीमध्ये जर आपल्या भावकीतील कुणाची कुणबी म्हणून नोंद असेल तर त्याच्या आधारे मराठा समाजातील एखाद्या व्यक्तीला कास्ट सर्टिफिकेट काढणे किंवा कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट काढणे यासाठी तशाही फारशा अडचणी येत नाहीत मात्र सरकारच्या नवीन जीआरप्रमाणे जुनी नोंद जर कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशी असेल तर त्या व्यक्तीला त्याच जातीचे प्रमाणपत्र मिळेल म्हणजेच एका अर्थी या व्यक्तीला ओबीसी म्हणून सरकारकडे नोंद असलेल्या ‘ कुणबी , लेवा कुणबी ,लेवा पाटील , लेवा पाटीदार आणि कुर्मी ‘ या जातीचे प्रमाणपत्र मिळूच शकणार नाही. सद्य परिस्थितीत सरकारकडून केवळ मराठा आंदोलकांची शाब्दिक भ्रम करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. कुणबी मराठा आणि मराठा कुणबी सर्टिफिकेट जरी हाती आले तरी ओबीसी म्हणून त्याचा वापर होऊ शकणार नसल्याकारणाने या प्रमाणपत्राचा तसाही काही फायदा होणार नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आहे .

महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये कुणबी नोंद असलेले जुने रेकॉर्ड नैसर्गिक आपत्ती तसेच इतर काही कारणांमुळे गायब झालेले असल्याकारणाने अनेक मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. आपल्या भावकीतील कुणाला कुणबी प्रमाणपत्र मिळालेले असले तर त्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवता येते मात्र अनेक ठिकाणी जुने रेकॉर्ड आढळून येत नसल्याकारणाने खुल्या प्रवर्गातून शैक्षणिक पातळीवर मोठी फी विद्यार्थ्यांच्या पालकांना भरावी लागते त्यामुळे देखील मराठा बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.


शेअर करा