आजपासून औषध पाणी बंद , मनोज जरांगेच्या मागण्या वास्तविकतेला धरून कशा ?

शेअर करा

जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अद्यापही सुरू असून मराठा आरक्षणासाठी त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आता सुमारे बारा दिवस उलटले आहेत. राज्य सरकार त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असून अद्यापदेखील ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मुख्यमंत्री यांनी अर्जुन खोतकर यांच्याकडे एक बंद लिफाफा दिलेला होता मात्र लिफाफा खोलल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा आपला निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केलेला आहे.

उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आजपासून पाणी बंद करणार आहे त्याचसोबत डॉक्टरांनी जोडलेले सलाईन देखील काढून टाकणार आहेत. शासनाच्या जीआरमध्ये कुठलीही दुरुस्ती झालेली नाही आणि लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना अद्याप बडतर्फ केलेले नाही त्यामुळे आपले उपोषण आता अधिक तीव्र करण्यात येईल , असा इशारा त्यांनी दिलेला आहे.

30 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता सोबतच हवेत गोळीबार देखील करण्यात आला. संपूर्ण राज्यात यानंतर संतापाची लाट पसरलेली असून राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी बंद पाळलेले आहेत तर मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ देखील अनेक ठिकाणी उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. नगर जिल्ह्यातील नेवासा तालुका तसेच नांदेड इथे देखील मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ इतरही मराठा कार्यकर्ते उपोषणात सामील झालेले असून आजपासून जरांगे यांचे उपोषण तीव्र करण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील बहुतांश निजामकालीन नोंदीमध्ये मराठा समाजाचा उल्लेख हा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असा करण्यात आलेला आहे स्पष्टपणे फक्त ‘ कुणबी ‘ असा उल्लेख करण्यात आलेला नाही. कुणबी असा उल्लेख जुन्या वंशावळीत असेल तर नवीन प्रमाणपत्र काढण्यास फारशा अडचणी येत नाहीत मात्र निजामकालीन नोंदी यात स्पष्टपणे केवळ ‘ कुणबी ‘ शब्दाचा उल्लेख नसल्याने अनेक मराठा बांधवांना याचा कुठलाही फायदा होणार नाही त्यामुळे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे , अशी मनोज जरांगे पाटील मुख्य मागणी आहे.

महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये कुणबी नोंद असलेले जुने रेकॉर्ड नैसर्गिक आपत्ती तसेच इतर काही कारणांमुळे गायब झालेले असल्याकारणाने अनेक मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. आपल्या भावकीतील कुणाला कुणबी प्रमाणपत्र मिळालेले असले तर त्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवता येते मात्र अनेक ठिकाणी जुने रेकॉर्ड आढळून येत नसल्याकारणाने खुल्या प्रवर्गातून शैक्षणिक पातळीवर मोठी फी विद्यार्थ्यांच्या पालकांना भरावी लागते त्यामुळे देखील मराठा बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.


शेअर करा