आमदार संग्राम जगताप यांनी घेतले विशाल गणपतीचे दर्शन , फेसबुकवर म्हटलंय की..

शेअर करा

नगर शहराचे ग्रामदैवत असलेले विशाल गणपती मंदिर इथे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी आज सकाळी भेट देऊन विधीवत दर्शन घेतले. आज श्रीगणेश प्रतिष्ठापनेचा दिवस असल्याकारणाने संपूर्ण नगर शहरात गणेश उत्साह मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी संपूर्ण नगर शहर सज्ज झालेले असून शहरातील अनेक ठिकाणी गणपती बाप्पाच्या मूर्ती आणि सजावटीचे साहित्य लहानमोठ्या दुकानात व रोडवरील स्टॉलवर विकले जात असून आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून येत आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहलेली असून त्यात , ‘ आज गणेश चतुर्थीला सर्वांचे लाडके दैवत गणपती बाप्पांचे आगमन झाले असून सकाळी माळीवाडा येथील आपल्या शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात श्रींच्या प्रतिष्ठापना पूजेस उपस्थिती लावून मनोभावे दर्शन घेतले. विशाल गणपती हे नगरचे ग्रामदैवत असून प्रत्येक नगरकरांचे श्रध्दास्थान आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणूनही विशाल गणपतीची राज्यभरात ख्याती आहे. येथील पारंपरिक गणेशोत्सवाचे सर्वच गणेशभक्तांना आकर्षण असते.

गणपती हे बुध्दीचे दैवत आहे. विघ्नहर्ता, सुखकर्ता प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. गणेशोत्सव ही आपल्याला मिळालेली मोठी परंपरा आहे. धार्मिक सण उत्सवांच्या माध्यमातूनच आपण एकत्र येतो. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी ऐतिहासिक गणपती उत्सवाची सुरुवात केली. अतिशय मोठा सांस्कृतिक, धार्मिक वारसा आपल्याला लाभला आहे हे आपल्या प्रत्येकाचेच भाग्य आहे
.
सर्व नगरकर अतिशय उत्साहात, जल्लोषात गणेशोत्सव साजरा करीत असून पुढील दहा दिवस सर्वत्र अतिशय धुमधडाक्यात उत्सव साजरा होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही उत्सवाची मोठी तयारी केली असून आबालवृध्दांना भावतील असे देखावे गणेशभक्तांना पहायला मिळणार आहेत. एकूणच सर्वत्र मांगल्य घेऊन आलेल्या गणेशोत्सवाचा आनंद प्रत्येकाने मनमुराद घ्यावा.’ असे म्हटलेले आहे .


शेअर करा