पंडित नेहरूजी..पाहताय ना तुमच्या नावाच्या बागेत काय चाललंय ?

शेअर करा

नगर शहरातील पंडित नेहरू उद्यान कुठे आहे असे विचारले तर तरुण पिढीला याविषयी काही सांगता देखील येणार नाही इतकी लाजिरवाणी परिस्थिती या उद्यानाची झालेली आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वी संध्याकाळी सहा वाजले की उद्यानाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत असायचे त्याचा झुळझुळ आवाज आणि आजूबाजूला सुंदर पद्धतीने सजवलेली बाग असे या उद्यानाचे स्वरूप होते. लालटाकी परिसरातील अप्पू चौक आणि पंडित नेहरू उद्यान माहित नाही असा माणूस नगर शहरात शोधून देखील सापडत नव्हता मात्र दुर्दैवाने या उद्यानाची आता अक्षरश: हागणदारी झालेली असून महापालिकेला आणि लोकप्रतिनिधींना यांचे काहीच सोयरसुतक राहिलेले नसल्याचे दिसून येत आहे.

आमच्या प्रतिनिधीने पाहणी केली त्यावेळी या ठिकाणी अक्षरशः लघवी आणि संडास करण्यासाठी या उद्यानाचा वापर होत असल्याचे दिसून आले. उद्यानाच्या कंपाउंड वॉलच्या आतमध्ये चक्क दारूच्या बाटल्या कंडोमची पाकिटे पडलेली आणि काही जनावरे उद्यानात बांधलेली आढळून आली. नगर शहरात ठीकठिकाणी उद्यानांची परिस्थिती अशीच लाजिरवाणी झालेली असून शहरात पालकांना लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी फिरायला घेऊन जाण्यासाठी उद्यानेच शिल्लक राहिली नाहीत . वाडिया पार्क खेळाचे ग्राउंड खाजगीकरणातून उभारण्यात आले आणि त्यातून काही व्यक्तींनी पैसे कमवून घेतले . चितळे रोडवरील नेहरू मार्केट देखील याच उद्देशाने पाडण्यात आले मात्र तिथेही काय झाले हे नगरकरांनी अनुभवलेले आहे.

पंडित नेहरू उद्यानाची जागा मोक्याच्या ठिकाणी असल्याकारणाने या ठिकाणी देखील असाच प्रकार भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्य परिस्थितीत या उद्यानाचा वापर अक्षरशः दारू पिण्यासाठी , सिगारेट ओढण्यासाठी , लघवी आणि संडासासाठी केला जात असून सुमारे कमरेइतके गवत अनेक ठिकाणी वाढलेले आहे त्याच्या देखील साफसफाईसाठी महापालिकेकडून कुठलेही प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. मनपाचे पूर्वीचे आयुक्‍त शंकर गोरे यांनी ही संपूर्ण जागा महापालिकेच्या ताब्यात नसल्याचे सांगितले होते त्यामुळे या ठिकाणी उद्यान विकसित करण्यात अडचणी येत असल्याचे म्हटले होते मात्र जेवढी जागा ताब्यात आहे तिचा तरी शक्य तितका विकास करा अशी नगरकरांची एकमुखी मागणी आहे .

पंडित नेहरू उद्यानाच्या सर्व बाजूंनी कंपाउंड आहे आणि आतमध्ये असलेली जुनाट झाडे अस्ताव्यस्त वाढलेली असल्याने पंडित नेहरू यांचा पुतळाच झाकला जात आहे. पंडित नेहरू यांचा पुतळा ज्या चबुतऱ्यावर उभा आहे तो चबुतरा देखील मोठ्या प्रमाणात तुटलेला असून त्या खालील पाण्याच्या टाकीत अक्षरश: बिसलरीच्या बाटल्या आणि कचरा साठलेला आहे. उद्यानाच्या जागेत जनावरे बांधून अक्षरशः या उद्यानाच्या जागेचा गोठा करण्यात आलेला आहे तर आजूबाजूला हागणदारीसाठी सध्या उद्यानाचा वापर होत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुमारे अडीच वर्षांपूर्वी शहरातील पंडित नेहरू उद्यानाला जपानच्या ‘ होकायामा ‘ बागेचे स्वरूप देण्याची घोषणा झाली होती त्याचे पुढे काय झाले हे अद्यापही समोर आलेले नाही. बाळासाहेब थोरात हे त्यावेळी महसूल मंत्री होते त्यामुळे तरी हा निर्णय अमलात येईल अशी अपेक्षा होती मात्र तरीही पुढे काही झाले नाही . केवळ आपल्या भेटीचा इव्हेन्ट करून पेपरला बातमी छापून आणण्यापर्यंतच नगरचे नेते सक्रिय आहेत की त्यापलीकडे देखील काही पाठपुरावा वगैरे गोष्ट असते याचेही त्यांना निदान भान आहे तरी का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

विशेष म्हणजे लालटाकी परिसरातील काँग्रेस कार्यालयापासून ही जागा अवघी तीनशे फुटावर आहे. ज्या पंडित नेहरूंच्या नावाने काँग्रेसकडून आत्तापर्यंत मते मागण्यात आली त्यांच्याच नावाच्या उद्यानाची अशी दुर्दशा पाहून वास्तविक नगरकरांनी नगर महापालिकेला आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारायला हवा . कित्येक महापालिका आयुक्त आले आणि गेले मात्र नगर शहरातील उद्यानांची परिस्थिती अत्यंत मात्र दिवसेंदिवस खराब होत असून निदान काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांनी देखील यासाठी किती आक्रमकता घेतलेली आहे असे नगरवासीय आता विचारत आहेत.


शेअर करा