इतकी हिम्मत येते कुठून ? , नगरमध्ये गुगल पे वर घेतली लाच

शेअर करा

नगर शहरात लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून पतसंस्थेतून घेतलेले कर्ज परत करण्यासाठी मुदत वाढवून दिल्याच्या बदल्यात चक्क ऑनलाईन पद्धतीने सात हजार रुपयांची लाच घेताना पतसंस्था फेडरेशनच्या वसुली अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहात पकडलेले आहे. कोतवाली पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , यासीन नासर अरब ( वय 42 ) असे याप्रकरणी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून तक्रारदार व्यक्ती हे केडगावजवळील भोरवाडी येथील रहिवासी आहेत . त्यांनी 2016 मध्ये केडगाव येथील भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतून सुमारे पाच लाखांचे कर्ज घेतलेले होते त्यासाठी त्यांनी भोरवाडी शिवारातील जमीन तारण दिली आणि कर्ज फेडण्यासाठी त्यांना पाच वर्षांची मुदत होती.

पाच वर्षे उलटून गेली तरी कर्जदार वेळेत कर्ज फेडू शकले नाही म्हणून पतसंस्थेने तालुका फेडरेशन यांच्याकडे याप्रकरणी तक्रार केली आणि आरोपी यांना तक्रारदार व्यक्तीने दोन महिन्यांची मुदत द्या अशी विनंती केली होती त्यानंतर 31 ऑगस्ट 2023 रोजी पतसंस्थेचे कर्ज देखील परत करण्यात आले. कर्ज परत करण्यास मी मुदत दिली तुझ्या नावावरील जमिनीवर जप्ती येऊन दिली नाही म्हणून तू मला 50 हजार रुपये दे , अशी त्यांना मागणी करण्यात आलेली होती.

तक्रारदार व्यक्ती यांनी त्यांना इतके पैसे देणे शक्य होणार नाही असे सांगितल्यानंतर तीस हजार रुपये देण्याचा त्यांचा व्यवहार ठरलेला होता. दरम्यानच्या काळात तक्रारदार व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आणि पथकाने सापळा रचला त्यामध्ये आरोपी अलगद सापळ्यात अडकलेला असून विशेष म्हणजे त्याने लाचेची रक्कम रोख न घेता चक्क गुगल पे वरून घेतलेली आहे. लाचखोर अधिकारी किती सोकावलेले आहेत आणि त्यांना कुणाचेच कसे भय राहिलेले नाही हे या घटनेत समोर आलेले असून सदर कारवाई ही पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.


शेअर करा