
नगर शहरात सध्या गणेशोत्सवाचे वातावरण असून महापालिका प्रशासनाने गेल्या 35 ते 40 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या स्वास्तिक चौकातील जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टची गणेशोत्सवाचा मंडप उभारण्याची परवानगी नाकारून अवघ्या एक वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मंडळाला परवानगी दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना घेराव घालून त्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. राजकीय वरदहस्त असलेल्या ताबा मारणाऱ्या नवीन गणेश मंडळाला हटवून जुन्या जनजागृती मित्र मंडळाला परवानगी देण्यासाठी आयुक्तांसमोर गणपतीची आरती देखील करण्यात आली. नगर शहरातील ताबा राज हटवावे यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यालयात घोषणा देण्यात आल्या.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासोबतच शिवसेना उद्धव गटाचे नेते विक्रम राठोड यांनी देखील या आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून गेल्या काही महिन्यांपासून किरण काळे व शिवसेना उद्धव गटाचे नेते विक्रम राठोड हे सातत्याने शहरातील ‘ ताबा राज ‘ हटवण्याची मागणी करत आहेत . नगर शहरातील स्वस्तिक चौकातील गणेश उत्सवासाठी दोन मंडळांनी एकाच जागेवर दावा केलेला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या अनेक वर्षापासूनच्या जनजागृती मित्र मंडळाला महापालिकेने अचानक परवानगी नाकारली आणि अवघ्या एक वर्षांपूर्वीच्या मंडळाला परवानगी दिली त्यामुळे हा वाद मोठ्या प्रमाणात सध्या चिघळलेला असून नागरिकांच्या मनातही अन्यायाची भूमिका आहे .
जुन्या मंडळांना परवानगी नाकारायची आणि अवघ्या काही महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या मंडळांना परवानगी द्यायची हा पद्धतशीरपणे जुन्या मंडळांवर अन्याय आहे. लोकप्रतिनिधींच्या दबावाच्या राजकारणाला आयुक्त साथ देत असल्याचा आरोप आंदोलक व्यक्तींकडून करण्यात आलेला असून राजकीय दबावाखाली निर्णय घेण्यात आलेल्या या मंडळाची परवानगी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. महापालिकेने परवानगी नाकारली तर नगर पुणे महामार्गाच्या रस्त्याच्या दुभाजकावरच मंडप उभारण्याचा इशारा अनिल शिंदे यांनी दिलेला असून जनजागृती मित्र मंडळ हे ट्रस्ट असून धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेऊनच महापालिकेत परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आलेला होता असे अनिल शिंदे यांनी सांगितलेले आहे.
सदर आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे , काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे , माजी महापौर भगवान फुलसौंदर , राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर , संजय झिंजे , दिलीप सातपुते , विक्रम राठोड , भाजपचे अजय आगरकर, वसंत लोढा , सचिन जाधव , संभाजी कदम यांच्या पथकाने महापालिका कार्यालयात आंदोलन करत गणपती बाप्पा मोरया म्हणत गणपतीची आरती देखील केलेली आहे.