अहिल्यानगरच्या बाजारपेठेतील ‘ ते ‘ काम चार दिवसात पूर्ण करू, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर मनपाचं लेखी पत्र 

शेअर करा

चितळे रोड ते चित्रा टॉकीज ते लक्ष्मी कारंजा ते पटवर्धन चौक या मध्यशहरातील महत्त्वाच्या रस्त्यासह अन्य संलग्न कामे रखडल्यामुळे नागरिक, व्यापारी यांची मोठी गैरसोय होत होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी या कामांची पाहणी करत मनपा आयुक्तांकडे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली होती. काम जलद गतीने पूर्ण न केल्यास शिवसेनेतर्फे काळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत चार आठवड्यांच्या आत काम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देत आंदोलन न करता सहकार्य करण्याचे आवाहन मनपाच्या वतीने शहर शिवसेनेला करण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे, कामगार सेनेचे शहरप्रमुख गौरव ढोणे, युवा सेना विधानसभा प्रमुख आनंद राठोड, सुनील भोसले यांनी म्हटले आहे. 

महापालिकेमार्फत महाराष्ट्र शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत शहरातील एकूण चोवीस रस्ते मंजूर आहेत. यापैकी चितळे रोड ते पटवर्धन चौक या रस्त्याचे काम रखडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या मार्गावर मध्यंतरी कचऱ्यांचा प्रचंड ढीग साचला होता. त्यातून दुर्गंधी सुटल्यामुळे परिसरातील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले होते. शिवसेनेच्या दणक्यानंतर मनपाने अठ्ठेचाळीस तासांच्या आत परिसर स्वच्छ केला होता. त्यानंतर रखडलेल्या कामाबाबत शिवसेनेची आक्रमक भूमिका होती. 

मनपाने दिलेल्या लेखी आश्वासनात कळविले आहे की, सदर काम हे प्रगतीपथावर असून संपूर्ण संकल्पना यावर आधारित आहे. त्यामुळे संकल्पनानुसार येणाऱ्या काट छेदा प्रमाणे येणारी खोली इतकी खोदाई करावी लागत आहे. तसेच सदर ठिकाणी जुन्या कालावधीमध्ये टाकलेल्या पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन फुटत आहेत. तसेच पाईपचा पावसाळी नाला देखील टाकला जात आहे. सदर कामकाज करताना भूमिगत युटिलिटी मोठ्या प्रमाणात तुटलेल्या असल्या कारणामुळे त्या जोडून देण्याच्या सूचना ठेकेदाराला करण्यात आले असून ते काम प्रगतीत आहे. त्याच्या बरोबर लगतच्या कालावधीमध्ये मोहरम सणामुळे एकूण लांबी पैकी आनंदी बाजार ते लक्ष्मी कारंजा या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित लांबीची देखील खोदाई व मजबुती करण्याचे काम प्रगतीवर असून तीस दिवसात काँक्रिटीकरणासह सुधारक काम पूर्ण करण्यात येईल. तो पर्यंत आपण कोणतेही आंदोलन न करता मनपास सहकार्य करण्याची विनंती मनपा प्रशासनाने केली आहे.

मध्य शहराच्या बाजारपेठेसह अन्य परिसरा मधील अनेक कामे देखील अर्धवट अवस्थेत आहेत. ती देखील नियोजनबद्द रित्या जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी शहर प्रमुख किरण काळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे. या मागणीवर शहर शिवसेना ठाम आहे. या कामां सह मनपाने दिलेल्या लेखी आश्वासना प्रमाणे चार आठवड्यांच्या आत चितळे रोड ते पटवर्धन चौक रस्त्याशी निगडित सर्व कामे पूर्ण करत नागरिकांसाठी सदर रस्ता खुला केला नाही तर ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले जाईल, असा स्पष्ट इशारा उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे पाटील, कामगार नेते विलास उबाळे यांनी दिला आहे. 


शेअर करा