‘ बापाला वाटलं पोरग डॉक्टर होईन पण ‘ , पोलिसाच्या मुलाने लावले दिवे

शेअर करा

पुणे पोलीस दलात काही वर्षांपूर्वी कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या मुलावर चक्क मकोका कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नगर शहरात चक्क वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून स्वतःची टोळी तयार करत असताना दरोडा, रस्ता लूट, फसवणूक आणि घातक हत्यारांचा वापर करून गुन्हेगार झालेल्या सागर आप्पासाहेब भांड ( राहणार ढवण वस्ती नगर ) याच्यासह त्याच्या टोळी विरोधात पोलिसांनी मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.

सागर भांड हा या टोळीचा प्रमुख असून त्यासोबत रवी पोपट लोंढे, निलेश संजय शिंदे, गणेश रोहिदास माळी, नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी, रमेश संजय शिंदे या सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या टोळी विरोधात राहुरी पोलीस ठाणे इथे मयूर दिलीप देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टोळीच्या विरोधात दरोडा आणि आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली आहे.

सदर टोळीने संघटितपणे धाक दाखवून जबरी चोरी, दरोडा, मारहाण, हत्यारांचा धाक दाखवणे असे अनेक गंभीर गुन्हे केलेले आहे. टोळीतील प्रत्येक आरोपीच्या विरोधात राहुरी, नगर एमआयडीसी, कोतवाली, शिर्डी, भिंगार, सुपा, शिक्रापूर आदी ठिकाणी देखील गुन्हे दाखल झालेले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी या टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी. जी शेखर यांच्याकडे सादर केला होता. सदर प्रकरणी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके पुढील तपास करत आहेत.

सागर याचे वडील पुणे पोलीस दलात कार्यरत होते तर सागर हा वैद्यकीय शिक्षण घेत होता मात्र याच दरम्यान कमी कष्टात जास्त पैसे मिळवायची त्याची इच्छा असल्याने त्याने गुन्हेगारीस सुरुवात केली आणि त्याला तशाच स्वरूपाचे मित्र देखील मिळत गेल्याने त्याने संघटीत गुन्हेगारी सुरु केली. आपल्या साथीदारांसह त्याने नगर जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे केलेले असून सागर याच्या विरोधात आतापर्यंत तब्बल २७ गुन्हे दाखल झाले आहेत.


शेअर करा