‘ आपण राजकीय नेते तितके हुशार नसलो तरी.. ‘, शरद पवार म्हणतात की..

शेअर करा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत आम आदमी पार्टी सरकारच्या विरोधातील सीबीआय कारवाई आणि राज्यातील नेत्यांच्या विरोधात ईडी कारवाई याबद्दल भाष्य केलेले असून मंगळवारी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे असेही पवार यावेळी म्हणाले. आम आदमी पार्टीच्या बाजूने उभे राहण्याबद्दल शरद पवार यांनी काँग्रेसला देखील आपल्या निशाण्यावर घेतले असून आगामी निवडणुकांत जनता भाजपला धडा शिकवेल त्यामुळे आपापसातील मतभेद बाजूला होऊन 2024 च्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे, असे देखील आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक, अनिल देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात केलेल्या कारवाईबद्दल शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. अनिल देशमुख गृहमंत्री होते त्यांना अटक केली, नबाब मलिक यांची काय चूक होती ? तर संजय राऊत हे केंद्राच्या विरोधात लिहित होते म्हणून त्यांना अटक झाली. देशात अशाच पद्धतीने कारवाया केल्या जात आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

देशात ज्या ज्या ठिकाणी भाजपची सत्ता नव्हती तिथे भाजपची सत्ता आणण्यात आली. राज्यातही शिवसेनेचे आमदार गेल्यामुळे भाजपला सत्ता मिळाली. केजरीवाल यांच्यासोबत आपले लाख मतभेद असतील मात्र सध्या तरी आम आदमी पार्टीच्या उभे पाठीशी उभे राहणे हे कॉंग्रेसचे कर्तव्य आहे कारण आपली खरी लढाई ही भाजप आणि सांप्रदायिक शक्तींच्या विरोधात आहे असे देखील पवार यावेळी म्हणाले.

आणीबाणीच्या काळात राजकीय वर्तुळात अशी भावना होती की पुढची पंचवीस वर्षे काहीही बदलणार नाही मात्र पुढच्याच वर्षी 1977 मध्ये लोकसभा निवडणुकीत लोकांनी बदल घडून आणला. आपण राजकीय नेते तितके हुशार नसलो तरी सामान्य माणूस हा खूप हुशार आहे तो 2024 ला भाजपला नक्कीच धडा शिकवेल, असेही पवार यावेळी म्हणाले.


शेअर करा