साडेतीनशे रुपये डिलिव्हरी चार्जेस , दहशतवाद समजून तपास पण ..

शेअर करा

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आले असून कर्नाटकातील बंगळुरू येथे ही घटना घडलेली आहे. एक महिला भाव देत नसल्याने आरोपीने तिची हत्या करण्यासाठी एका मिक्सरमध्ये स्फोटक जोडून हा मिक्सर तिच्या घरी रवाना केला होता मात्र ही भेट कोणाकडून आहे हे लक्षात न आल्याने या महिलेने ही भेट स्वीकारली नाही त्यामुळे ती वाचली मात्र ज्या कुरियरने ही भेट आलेली होती त्या कुरियर मध्ये हा मिक्सर पुन्हा येऊन पडला.

डिलिव्हरी बॉय याने हा मिक्सर सदर महिला स्वीकारत नसल्याने कंपनीच्या गोडाउनमध्ये आणून ठेवलेला होता त्यानंतर तिथे कंपनीचा मालक आला आणि नक्की काय आहे हे पाहण्यासाठी म्हणून पार्सल उघडले त्यावेळी तिथे त्या मिक्सरचा स्फोट झाला. सुरुवातीला पोलिसांनी दहशतवादाशी संबंधित ही घटना आहे असे समजून तपास सुरू केला होता मात्र वेगळीच माहिती समोर आलेली आहे.

हसन परिसरात राहणारा एक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून या महिलेवर लक्ष ठेवून होता. कुरियरच्या माध्यमातून त्याने याआधी देखील महिलेला भेटवस्तू पाठवल्या होत्या मात्र तिने त्या स्वीकारल्या नाहीत . आरोपीला तिचा पत्ता नक्की कुठून मिळाला याचा देखील पोलीस सध्या शोध घेत आहे पण पाठवत असलेले एकही गिफ्ट ही महिला घेत नसल्याने त्याने तिला संपवण्याचा विचार केला आणि त्यातून हे अघोरी कृत्य केले.

कुरियर कंपनीचे मालक असलेले शशिकुमार यांच्या डिलिव्हरी बॉयने या महिलेकडे डिलिव्हरी चार्जेस म्हणून साडेतीनशे रुपयांची मागणी केली होती मात्र महिलेने हे गिफ्ट कुणी पाठवले आहे हेच लक्षात न आल्याने ते स्वीकारण्यास नकार दिला . डिलिव्हरी बॉय हे गिफ्ट घेऊन पुन्हा कार्यालयात आला आणि त्याने ते गिफ्ट ठेवून दिले. निनावी स्वरूपाचे गिफ्ट असल्याने शशिकुमार यांनी पार्सल उघडले त्यावेळी त्यात मिक्सर असल्याचे दिसून आले. मिक्सर व्यवस्थित आहे का हे पाहण्याचा शशिकुमार यांनी प्रयत्न केला मात्र याच दरम्यान स्फोट झालेला असून शशिकुमार हे जखमी झाले आहेत. पोलीस अधीक्षक यांनी हे प्रकरण दहशतवादाशी संबंधित नसून एकतर्फी प्रेमप्रकरणातून घडल्याचे सांगितले आहे.


शेअर करा