स्वतंत्र भारत पक्ष शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार , तारीखही ठरली..

शेअर करा

शेतकऱ्यांना कर्जमाफी , वीज , पीकविमा आणि वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान तसेच पिकांची आयात निर्यात याप्रकरणी केंद्राचे धोरण या प्रकरणावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली 18 जानेवारी 2024 रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येणार आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी याप्रकरणी माहिती दिलेली आहे. 

अनिल घनवट म्हणाले की , शेतीमाल व्यापारातील सरकारच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे शेतमालाचे भाव पडतात परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो. आज देशात गहू , तांदूळ कडधान्य , साखर, कांदा आदी पिकांवर निर्यातबंदी , साठ्यांवर मर्यादा असे निर्बंध आहेत. मोठ्या प्रमाणात आयात करून देशात पिकणाऱ्या उत्पादनांचे भाव पाडले जात आहेत. सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जात बुडाला असून शेतीसाठी मर्यादित वेळेत वीज पुरवठा होतो तो देखील रात्री आणि अपुऱ्या दाबाने केला जातो. 

शेतकऱ्यांना पीक विम्याचे गाजर दाखवून खाजगी कंपन्यांचे गल्ले भरले जात आहेत तर दुसरीकडे वन्यप्राणी शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान करून शेतकऱ्यांना जेरीस आणत आहेत. एखादा प्राणी मारला गेला तर मारा शेतकऱ्याला तुरुंगात डांबण्याची कारवाई तात्काळ करण्यात येते. शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 18 जानेवारी रोजी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे

देशात शेती प्रश्नासोबतच बेरोजगारी , गुन्हेगारी , कायदा सुव्यवस्था , महिला सुरक्षा , भ्रष्टाचार महागाई आणि अवास्तव कर यामुळे सध्या नागरिक हैराण झालेले असून स्वतंत्र भारत पक्षाने पुरस्कृत केलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेशिवाय देशाला पर्याय नाही असे देखील त्यांनी म्हटलेले आहे. 


शेअर करा