नगर शहरात पेट्रोल पंपावर लागल्या रांगा , नक्की काय आहे कारण ?

शेअर करा

केंद्र सरकारकडून आणण्यात आलेला हिट अँड रन कायदा हा जाचक असल्याचा आरोप करत देशभरातील वाहतूकदारांनी तीन दिवसांच्या वाहतूक बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. नगर शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावर सध्या पेट्रोल डिझेल उपलब्ध नसल्याचे बोर्ड झळकत असून  जिथे कुठे पेट्रोल डिझेल शिल्लक आहे त्या पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. 

अखिल भारतीय ट्रक चालक-मालक संघटनेने हा संप पुकारलेला असून सर्वच वाहतूक क्षेत्रावर यामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. आज सकाळपासूनच पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत होती त्यामुळे उपलब्ध असलेले इंधन विक्री झाल्यावर पंप बंद ठेवण्याची वेळ इंधन विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर आलेली आहे.

अखिल भारतीय ट्रक चालक-मालक संघटनेच्या आजच्या संपाचे मुख्य कारण हे हिट अँड रन संदर्भात कायद्याचे असून तीन दिवसांचा हा संप पुकारण्यात आलेला आहे. नवीन हिट अँड रन कायद्यामध्ये सात लाखांपर्यंत दंड आणि दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असल्याने वाहतूकदारांमध्ये या कायद्याच्या विरोधात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहन बाळगणाऱ्या व्यक्तींवर या संपाचा आतापर्यंत तरी कुठलाही परिणाम झालेला दिसून येत नाही. 


शेअर करा