नायलॉन मांजा विक्रेत्यांची माहिती कळवा अन पाच हजार मिळवा , मोबाईल नंबर केला जाहीर 

शेअर करा

नगर शहरात संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घराच्यावरती गच्चीवर तसेच बाल्कनीत गाणी लावून अनेक पतंग शौकीन ‘ ओये काप्पे ‘ च्या सुरात ओरडून पतंग उडवत हा संक्रांतीचा सण साजरा करतात मात्र गेल्या काही वर्षांपासून या सणाला नायलॉन मांजा चे ग्रहण लागलेले आहे . नायलॉन मांजा वापरणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई चे संकेत महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी दिलेले असून संक्रांत झाल्यानंतरच कारवाईचा आकडा समोर येणार आहे . महापालिका प्रशासनाने नागरिकांसाठी एक मोबाईल नंबर देखील तक्रारी करण्यासाठी दिलेला असून आता मनपा प्रशासन केवळ नागरिकांच्या तक्रारींची वाट पाहणार की स्वतःहून कारवाई करणार हे येत्या काळात पाहावे लागेल. 

सरकारने यापूर्वीच प्रतिबंध केलेला नायलॉन मांजा कुणी विकला तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जो कोणी व्यक्ती नायलॉन मांजा विकणाऱ्या विक्रेत्याची माहिती प्रशासनाला देईल त्याला महापालिका प्रशासनाकडून पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल असे देखील आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी एका बैठकीत सांगितलेले आहे. 

महापालिका प्रशासनाकडून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची माहिती देण्यासाठी 75 88 16 86 72 हा नंबर देखील देण्यात आलेला असून आपल्या परिसरात कोणी नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आले तर या नंबरवर संपर्काचे आवाहन करण्यात आलेले आहे. डॉक्टर पंकज जावळे यांनी , ‘ नागरिकांनीच स्वतःहून नायलॉन मांजाचा वापर करणे टाळावे . कारण अनेक पशुपक्षी आणि मनुष्यांच्या देखील जीवाला यामुळे धोका होतो ‘ असे देखील नगरकरांना आवाहन केलेले आहे. 


शेअर करा