नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना ‘ प्रसिद्धीपत्रकाची मलमपट्टी ‘ , अजून किती दिवस ? 

शेअर करा

नगर अर्बन बँकेचे ठेवीदार गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले असून पोलीस प्रशासन तसेच इतर शासकीय विभागांकडून सक्रिय हालचाली होताना दिसून येत नाहीत त्यामुळे ठेवीदारांमध्ये चिंतेच्या वातावरणात भर पडते आहे. अशा परिस्थितीत नगर अर्बन बँकेचे अवसायक श्री गणेश गायकवाड यांनी एक जानेवारी २०२४ रोजी एक प्रसिद्धीपत्रक माध्यमांसाठी दिलेले असून प्रसिद्धी पत्रकामध्ये बँकेच्या कर्जदारांना आणि जामीनदार यांना कर्ज रक्कम सव्याज तात्काळ भरण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे . रक्कम भरली नाही तर कायदेशीर कारवाईचा देखील इशारा देण्यात आलेला आहे . बँकेच्या मोठ्या थकबाकीदारांवर तात्काळ कारवाई केली तरी ठेवीदारांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे मात्र पत्रक काढून ठेवीदारांच्या जखमेवर फक्त मलमपट्टी लावण्याचे काम करण्यात आलेले आहे की प्रत्यक्षात कारवाई केली जाईल हे येत्या काळात पहावे लागेल. 

अवसायक गणेश गायकवाड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की.. 

बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्जदारांना आणि जामीनदारांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपणाकडे असलेल्या कर्ज रकमांची व्याजासहित कर्ज येणे बाकी आपण तात्काळ भरावी अन्यथा बँक आपण व आपले जामीनदार यांच्याविरुद्ध कर्ज रकमा वसुलीसाठी पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल . जाहीर आवाहन करून देखील आपण प्रतिसाद न दिल्यास अशा सर्व कर्जदारांची आणि  जामीनदारांची नावे बँकेच्या वेबसाईटवर प्रसारित करून तारण दिलेली मालमत्ता प्रत्यक्षात ताब्यात घेऊन त्यांची जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल. 

बँकेकडे असलेल्या सर्व प्रकारच्या ठेवी सुरक्षित असून बँकेकडे पुरेशी तरलता असून मोठ्या प्रमाणावर कर्ज वसूल करून उर्वरित निधीची पूर्तता करण्यात येणार आहे. सर्व ठेवीदारांचे पैसे डीआयसीजीसी व केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांचे नियमानुसार व आदेशानुसार वितरित करण्याची प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. सर्व ठेवीदारांनी त्यांची ‘ आपला ग्राहक ओळखा ‘ केवायसी तसेच आधार कार्ड , पॅनकार्ड, ड्रायव्हिंग परवाना इत्यादी स्व स्वाक्षरीत करून बँकेच्या नजीकच्या शाखेत 15/1/2024 पर्यंत सुपूर्त करावे याव्यतिरिक्त बँकेच्या दैनंदिन प्रशासकीय खर्चात कपात करणे व आवश्यक त्या  उपायांची अंमलबजावणी करत आहोत , ‘ असे या पत्रामध्ये म्हटलेले आहे


शेअर करा