शेअर मार्केटमध्ये ‘ डिजिटली ‘ लुटल्याने शेवगावात आत्महत्येचा प्रयत्न , कसे चालते रॅकेट ? 

शेअर करा

नगर चौफेरने जिल्ह्यातील शेअर मार्केटच्या बनावटगिरीविषयी यापूर्वीच बातमी दिलेली होती सद्य परिस्थितीत ग्रामीण भागातील तरुणांना हाताशी धरून त्यांना आकर्षक कमिशन देत तरुणांना हेरून या व्यवसायात आणायचे आणि त्यानंतर त्यांना डिजिटली लुटायचे अशा पद्धतीने टोळकी कार्यरत आहेत याविषयी वृत्त दिलेले होते. शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात एका तरुणाने शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्यानंतर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेला असून खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

नगर जिल्ह्यात शहरांसोबत तालुक्याच्या ठिकाणी देखील शेअर मार्केटच्या नावाखाली आणि शेअर मार्केटच्या क्लासेसच्या नावाखाली कमी कष्टात जास्त पैसे कमवण्याची हौस असणाऱ्या तरुणांना हेरण्यात येते आणि त्यानंतर शेअर मार्केटच्या मोहजाळात त्यांना अडकवण्यात येते. काळा पैसा असलेल्या अनेक जणांनी शेअर मार्केटला पैसा लावलेला आहे मात्र यामध्ये गोरगरीब आणि शेतकरी कुटुंबातील देखील तरुणांचा लक्षणीय सहभाग आहे. महिन्याला मोठा परतावा दिला जाईल असे आमिष दाखवत या तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यात येते आणि त्यानंतर आहे ते सर्व गमावून अखेर शिल्लक हातात काहीच राहत नाही. 

तरुणांना जाळ्यात ओढल्यानंतर चकाचक चार चाकी गाड्या , आलिशान ऑफिस अशा स्वरूपाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर आपल्याला देखील अशीच लाइफस्टाइल मिळेल या आशेने ग्रामीण भागातील तरुण हळूहळू यात अडकत जातात. काही रक्कम अडकवल्यानंतर पर्याय राहत नाही म्हणून शेतीवर कर्ज काढ , सोन्याचे दागिने गहाण ठेव अशा पद्धतीने संपूर्ण काही गमावल्यानंतर शिल्लक काही राहत नाही. मोठ्या थाटात सुरू करण्यात आलेल्या गुंतवणूक कार्यालयांना टाळे लागलेले असून इतरही त्याच मार्गावर आहेत फक्त बंद केल्यावर पोलीस मागे लागतील म्हणून आज रोजी कार्यालये उघडी आहेत . 

नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा स्वरूपाने शेअर मार्केटचा व्यवसाय सुरू असून काही जणांना भूलवण्यासाठी एकाला पैसे दिले जातात आणि त्याची जाहिरात करून आणखीन शंभर जणांना जाळ्यात ओढले जाते. अनेक व्यक्तींनी यामध्ये स्वतःच्या ठेवी मोडून जमिनी तारण ठेवून बँकांचे कर्ज काढून पैसे अडकवलेले असून गुंतवणूक केलेली रक्कम परत काढून घेणे देखील सध्या परिस्थितीत अवघड झालेले आहे. 


शेअर करा