नगरमधील कचऱ्याचे ढिगारे वाढवताहेत कुत्र्यांचे प्रजनन , नगरकर दंडाशिवाय सुधारणार नाहीत

शेअर करा

अहमदनगर महापालिकेत प्रशासक राज सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्याचीच भूमिका नसल्याने शहरात कचऱ्यांचा ढिगारा मोठ्या प्रमाणात साचलेला पहायला मिळत आहे. नगर शहरातील मुख्य बाजारपेठ , आडते बाजार  , गंज बाजार तसेच सावेडी उपनगरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असून महापालिका यंत्रणा सध्या निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे . 

महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या हातात आला आणि त्यानंतर शहरातील पालिकेचे कामकाज मोठ्या प्रमाणात ढेपाळलेले आहे. आयुक्त पंकज जावळे यांनी अनेकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलेले आहे मात्र आयुक्त जावळे यांना गुंगारा देऊन काम चुकारपणा करण्यात कनिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी पटाईत झालेले आहेत. 

नगर शहरात ठिकठिकाणी कचरा गाडी रोज कचरा गोळा करत असते मात्र नागरिकांना देखील जबाबदारीचे भान राहिलेले नाही. सद्य परिस्थितीत लोकप्रतिनिधी नसल्याकारणाने पालिका प्रशासनाला नागरिकांनाच दंड करण्याची मोहीम राबवावी लागणार आहे मात्र तितकी हिम्मत मनपा आयुक्त दाखवतील का ? हा मोठा विषय आहे . 

आतापर्यंत नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली तर लोकप्रतिनिधी यांचा विरोध पालिका प्रशासनाला होत असायचा मात्र आता प्रशासक राज असल्याकारणाने अशा प्रकारची दंडात्मक कारवाई करण्यास मनपा प्रशासनाचे हात कोणी बांधलेले नाहीत. नागरिकांना कुठलेच जबाबदारीचे भान नसल्याने घंटागाडी गेल्यानंतर कचरा रस्त्यावर फेकण्याचे प्रकार घडत आहे. 

नागरिकांनी ठिकठिकाणी फेकलेला कचरा त्यात पडलेले उष्टे मुबलक अन्न यामुळे नगर शहरात कुत्र्यांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होत असल्याने ही भटकी कुत्री रात्री नागरिकांवर हल्ला करतात. कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून पैसे बरबाद करण्यापेक्षा निदान कचरा व्यवस्थापनाकडे जरी लक्ष दिले तरी मोकाट कुत्र्यांची संख्या आटोक्यात येण्यासारखी आहे मात्र त्या दृष्टीने कुठलेही प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. 


शेअर करा