नगरमध्ये पारिजात चौकात अग्नितांडव , मनपा अन राजकीय पुढारी सगळेच मिळालेले

शेअर करा

नगर शहरातील गुलमोहर रोडवरील पारिजात चौकात 16 तारखेला दुपारी दोनच्या सुमारास आग लागून चार दुकाने या आगीमध्ये भस्मसात झालेली आहेत. 16 तारखेला दुपारी दोनच्या सुमारास काही अज्ञात कारणाने एका दुकानात आग लागली आणि त्यानंतर आगीने पेट घेतला आणि चार दुकाने जळून खाक झाली आहेत. नगर चौफेर प्रतिनिधीने पाहणी केली त्यावेळी अक्षरशः या दुकानांचा कोळसा झालेला असून दुकानातील लाखो रुपयांच्या मालाचे देखील नुकसान झालेले आहे.

पारिजात चौकामधील दरबार केटरर्सच्या बाजूला काल दुपारी हे अग्नीतांडव झालेले असून सुदैवाने ही आग केटरिंगच्या दुकानापर्यंत आली नाही अन्यथा गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठा अनर्थ झाला असता सुदैवाने तो टळलेला असून शुक्रवार असल्याकारणाने ज्या दुकानात आग लागली त्या दुकानातील बहुतांश कर्मचारी नमाज पढण्यासाठी गेलेले होते त्यामुळे जीवितहानी देखील सुदैवाने टळलेली आहे . जळून खाक झालेल्या दुकानांमध्ये एक भंगाराचे दुकान , दुसरे कपाटाचे दुकान , तिसरे आरशांचे दुकान आणि एक कुशनचे दुकान होते सोबतच पत्र्याच्या गाळ्यामध्ये ही सर्व दुकाने सुरू होती त्यामुळे आग वेगाने पसरत गेली.

नगर शहरात मोकळ्या जागेवर जागा मालकाची संमती घेऊन पत्र्याच्या गाळ्यांमध्ये कमी खर्चात शेड ठोकायचे आणि त्यानंतर हे गाळे भाड्याने द्यायचे असा उद्योग बहुतांश जागामालकांनी सुरू केलेला आहे अर्थातच महापालिका अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याकारणाने काही कारवाई होणार नाही याची गॅरंटी असल्याने आणि कारवाईची वेळ आली तर विद्यमान राजकीय नेतृत्व हस्तक्षेप करत असल्याने असे प्रकार सुरू झालेले आहेत. दुर्दैवाने असा काही प्रकार घडला तर त्या ठिकाणी राजकीय नेत्यांनी भेट देऊन महापालिका अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश द्यायचे मात्र दुसरीकडे आतून सूत्रे हलवत अशा बांधकामांना पाठिंबा देणारीच भूमिका सातत्याने घ्यायची असे शहरात चित्र असून तपोवन रोड आणि भिंगार इथे देखील काही महिन्यांपूर्वी असेच अग्नितांडव घडलेले होते.

राजकीय हस्तक्षेप धुडकावत महापालिका अधिकाऱ्यांनी वास्तविक अशा बांधकामांवर तात्काळ कारवाई करायला हवी मात्र काही अज्ञात कारणांनी ही कारवाई केली जात नाही यावर देखील नगरकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे. एका बाजूला पक्के बांधकाम करण्यासाठी कागदपत्राची जंत्री महापालिका अधिकाऱ्यांच्या समोर सादर करायची अन त्यानंतर त्यांचे हात ओले केल्यानंतरच बांधकामाला परवानगी मिळते त्यापेक्षा हा पर्याय सोपा ठरत असल्याने जागा मालकांना भाडे कमी मिळाले तरी चालेल पण कमी खर्चात लगेच भाड्याचा मीटर सुरू होत असल्याने अन सोबतच सर्वांचीच ‘ मिलीभगत ‘ असल्याकारणाने असे प्रकार नित्याचे झालेले आहेत .


शेअर करा