औरंगजेबाच्या कबरीला भेटीवरून प्रकाश आंबेडकर म्हणाले , ‘ तुमचे पूर्वज जयचंद अन .. ‘

शेअर करा

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीला दिलेली भेट दिल्याने त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे मात्र प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्व आक्षेप फेटाळून लावताना औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण करणाऱ्या संघटनांना सडेतोड शब्दांमध्ये फटकारले आहे .

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

सदर घटनेला मी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली असे म्हणता येईल मात्र या स्थळावर शेवटी लोकांची श्रद्धा आहे, आपली श्रद्धा आहे की नाही, हा वेगळा भाग आहे. ज्याला मानायचं आहे, त्यांनी मानावं, ज्यांना नाही मानायचं त्यांनी मानू नये मात्र मानणाऱ्या आणि न मानणाऱ्यांनी एकमेकांचा अपमान करु नये. लोकांच्या या श्रद्धेचा मान आपण राखला पाहिजे, त्याचा आदर झाला पाहिजे. सरकारनेही या श्रद्धेचा अपमान करु नये.

औरंगजेबावरुन वाद निर्माण करणाऱ्यांनी प्रथम स्वत:चे चारित्र्य बघावे. तुम्ही औरंगजेबाच्या दरबारात कामाला होतात की नाही, तिकडे नोकऱ्या करायचात की नाही हे सांगावे. आम्ही तर दरबारात साधे चोपदारही नव्हतो. त्यामुळे लोकांना शहाणपण शिकवताना प्रथम आपला इतिहास तपासावा. जुन्या काळात जयचंद होते, त्यांनी परकीयांना राज्यात आणलं, त्यामुळे आपण गुलाम झालो. त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी प्रथम ते जयचंद आहेत की नाही याचा खुलासा करावा आणि मग आमच्यावर टीका करावी.

राज्यात १२ ठिकाणी दंगली करण्याचा प्रयत्न झाला. नागपूर एसआयटीचा रिपोर्ट वाचला तर त्यामध्ये सरकारला सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. काही संघटना राज्यात दंगल करणार आहेत असा अहवाल होता मात्र महाराष्ट्राच्या जनतेने दंगलींना प्रतिसाद दिला नाही. सर्व दंगली दोन ते तीन तासांमध्ये आटोक्यात आल्या. याचा अर्थ महाराष्ट्रातील जनतेचा या दंगलींना पाठिंबा नाही. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्त्व हे प्रबोधनकारांचे हिंदुत्त्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्त्वही प्रबोधनकारांचे हिंदुत्त्व होते नंतर सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी जे जे करता येईल, ते ते केल पण शिवसेनेच्या हिंदुत्वाचा मूळ गाभा हा प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचाच राहिला. आता उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही त्याच मार्गावर चालत आहे, असेही प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले .


शेअर करा