नगरच्या सायबर टीमची मोठी कारवाई , ऑनलाईन फ्रॉडची तक्रार आली अन..

शेअर करा

नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवत फसवणूक करण्याचा प्रकार समोर आलेला असून एका व्यक्तीची तब्बल 12 लाख 36 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आलेली आहे . विशेष म्हणजे नगरच्या सायबर पोलिसांनी याप्रकरणी प्रचंड सक्रियता दाखवत तीन आरोपींना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली असून फसवणूक करणाऱ्या एकूण रकमेपैकी पाच लाख पाच हजार रुपये पुन्हा मिळवण्यात आलेले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील एका व्यक्तीला व्हाट्सअपवरून आणि टेलिग्रामवरून एका कंपनीचे आम्ही अधिकारी आहोत असे सांगत तुम्हाला पार्ट टाइम जॉब देऊ असे म्हणत त्यानंतर कामासाठी डिपॉझिट म्हणून तब्बल 12 लाख 36 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आलेली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यापर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर तात्काळ त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनात योग्य त्या कारवाईचे आदेश दिले त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप , पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी , राहुल मुसळे , अभिजीत आरकल यांच्या पथकाने तांत्रिक तपास करत ही सर्व रक्कम हरियाणा , गुजरात , उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश येथील व्यक्तींच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले.

सदर प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरुवात केली आणि हिरामण पंडित सोनवणे ( वय 36 राहणार नाशिक ), शक्ती माणिक लाल कर्नावट ( वय 34 राहणार नाशिक ) यांना तात्काळ अटक केली त्यानंतर त्यांचा मित्र भावेश गथानी ( वय 30 राहणार घाटकोपर मुंबई ) यालाही ताब्यात घेण्यात आले. संबंधित बँकेशी संपर्क साधल्यानंतर एकूण रकमेपैकी पाच लाख पाच हजार रुपये पुन्हा मिळवण्यात आलेले असून पुढील तपास संजय सोनवणे करत असल्याची माहिती आहे .


शेअर करा