नवा इतिहास घडत आहे ‘ जाहिरातबाजांचा ‘, विकासनिधीपेक्षा केलेल्या कामांचे फ्लेक्स लावा

शेअर करा

नगर शहरात आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखे यांच्या कर्तृत्वाचे फलक रोज शहरात फ्लेक्सच्या माध्यमातून लावण्यात येत असून निधी आणल्याच्या फलकापेक्षा केलेल्या कामाचे फलक लावावेत अशी मागणी नागरिकांची आहे. मोठ्या मोठ्या पेपरमध्ये फुल स्क्रीन जाहिराती देऊन आणलेला निधी जाहिरातबाजीवर तर उधळला जात नाही ना ? इतपत शंका यावी इतक्या या जाहिराती सध्या सुरु आहेत तर दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यांची परिस्थिती मात्र दयनीय झालेली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या शिफारसीने नगरमध्ये दाखल झालेल्या मनपा आयुक्तांना या मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या या फ्लेक्सबाजीवर कारवाई करण्यास वेळ मिळालेला नाही. 

ज्या रस्त्यांवरून रोज हजारो नागरिक प्रवास करतात त्या रस्त्यांच्या कामाला प्राथमिकता देण्यापेक्षा आपल्या मर्जीतील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या परिसरात सिमेंट रोडच्या घोषणा केल्या जात आहेत. काही ठिकाणी कामे देखील सुरू करण्यात आलेली असून मर्जीतील कार्यकर्त्यांच्या प्रभागासाठी हा निधी वापरला जात असल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्ते सांभाळा ते आपल्याला सांभाळतील अशा पद्धतीने सध्या विद्यमान आमदार आणि खासदार यांचे नियोजन सुरू आहे. 

लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असल्याने खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहिता लागण्याच्या आधीच मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यासाठी जाहिरात बाजीला सुरुवात केलेली आहे. आचारसंहिता येईपर्यंत जमेल तेथील उद्घाटने , भूमिपूजने , मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा सध्या धडाका लावलेला असून आमदार संग्राम जगताप यांना विधानसभेला विखेंनी मदत करायची आणि संग्राम जगताप यांनी विखे यांना खासदारकीला मदत करायची असे साटे लोटे त्यांच्यात दिसून येत आहे. आमदार संग्राम जगताप यांनी एकेकाळी ज्यांना ‘ कुजय ‘ म्हणून हिणवलं त्यांच्यासोबत सध्या आमदार काम करत आहेत. 

पारनेरचे आमदार निलेश लंके आज रोजी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असून त्यांच्या पत्नी राणीताई लंके ह्या नगर दक्षिणमधून खासदारकीची निवडणूक लढवण्याची इच्छुक आहेत. निलेश लंके यांनी गेल्या काही महिन्यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लक्ष दिलेले असून निलेश लंके यांची कार्यकर्त्यांची फौज ही सुजय विखेंसमोर मोठे आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे.  आमदार निलेश लंके यांनी शिवपुत्र संभाजी कार्यक्रम नगरकरांना मोफत दाखवला मात्र मोफत आमिषांना नगरकर सहसा बळी पडत नाही त्यासाठी लंके यांना काहीतरी विधायक दिशादर्शक प्रोग्राम नगरकरांसाठी द्यावा लागेल. मागील निवडणुकीत राहुरी मतदार संघात शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांकडून वाटप करण्यात आलेल्या मोफत मटणाची चर्चा त्यावेळी चांगलीच रंगली होती मात्र शिवाजी कर्डिले यांचे प्रतिस्पर्धी प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांचा दारुण पराभव करत राहुरी मतदार संघात इतिहास घडवला होता. 


शेअर करा