‘ दुसऱ्याचे लेकरू मोठं करायच्या नादात ‘,  पारनेरच्या सभेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की..

शेअर करा

मनोज जरांगे पाटील यांनी पारनेर येथील सभेत बोलताना , ‘ ज्यांना मोठे केले तेच आपली बाजू घेत नाहीत म्हणून त्यांच्या मागे फिरू नका . माझा समाज हीच माझी सत्ता आणि संपत्ती आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एक इंच देखील मागे हटणार नाही ‘, असा स्पष्टपणे इशारा देत राजकारण हा आपला मार्ग नसल्याचे म्हटलेले आहे. 

23 तारखेला दुपारी सकल मराठा समाजाच्या वतीने पारनेर येथील बाजार तळावर सभा आयोजित करण्यात आलेली होती त्यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राजकारण हा मार्ग नसल्याचे सांगितल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मराठा बांधवांकडून प्रत्येक गावातून दोन उमेदवार देण्याचा निर्णय बारगळला असल्याची चर्चा सुरू आहे. आज अंतरवाली सराटी इथे सकाळी अकरा वाजता विराट सभेचे आयोजन करण्यात आलेले असून या वेळी मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे. 

पारनेर येथे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की , ‘ लोक चळवळीवर माझा विश्वास आहे. सात महिने झाले मी आणि माझा समाज रस्त्यावर आहे मात्र तरीही सरकार कडून आरक्षण देण्यास टाळाटाळ केली जात आहे . मराठा समाजाने अंग काढून घेतले तर यांच्यासोबत कोणीही राहणार नाही. आरक्षणाची ताकद ओळखा . दुसऱ्याच लेकरू मोठ करायच्या नादात आपल्या लेकराला फाशी घ्यायची वेळ आली याचा समाजाने विचार करायला हवा. 

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की , ‘ माझ्या चौकशीसाठी एसआयटी नेमली. मला जेलमध्ये टाकण्याचे षडयंत्र रचले. मी जेलमध्ये गेलो तर तिथेही स्वस्थ बसणार नाही कैद्यांना एकत्र करून त्यांचाही मोर्चा काढील. मराठ्यांनी व्यसनांपासून लांब राहावे. स्वतःमध्ये बदल घडवावा. भावाभावांची बांधावरून होणारी भांडणे थांबली पाहिजेत. आपली लेकरं मोठी करा पुढाऱ्यांच्या मागे पडू नका एकजूट कायम ठेवा , ‘ असे देखील आवाहन त्यांनी केलेले आहे. 


शेअर करा