नगरमध्ये अडीच वर्षांपासून गोरगरीबांच्या पोटाचा आधार ठरलेल्या ‘ फूड व्हॅन ‘ ची गोष्ट

शेअर करा

कोरोना काळात नगर शहरात शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने सुरु करण्यात आलेली फूड व्हॅन अद्याप देखील नगर शहरात सुरू असून गेल्या अडीच वर्षांपासून शहरातील गोरगरीब नागरिकांच्या तसेच उपचारासाठी दवाखान्यात आलेल्या जनतेच्या भुकेल्या पोटाला आधार देण्याचे काम करत आहे .

शहरातील सुमारे आठ ते दहा ठिकाणी दररोज फूड व्हॅन फिरत असून अवघ्या दहा रुपयात ट्रस्टच्या वतीने जेवणाचे पार्सल नागरिकांना देण्यात येते. शेकडो नागरिक रोज या उपक्रमाचा लाभ घेत असून ट्रस्टच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सेवेमध्ये आजपर्यंत एक दिवसाचा देखील खंड पडलेला नाही. नगर शहरातील शांतिकुमारजी फिरोदिया ट्रस्टच्या वतीने ७८७५ ००४ ००४ हा व्हाट्सअप नंबर जारी करण्यात आलेला असून त्यावर मेसेज केल्यानंतर फूड डिलिव्हरीची वेळ आणि ठिकाण हे समोरच्या व्यक्तीला रिप्लाय करत कळवले जाते.

फूड बँक डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला त्यावेळी बनवण्यात येणारे रोजचे अन्न हे शहरातील आनंदऋषीजी हॉस्पिटलजवळ असलेल्या महावीर भवन इथे बनवले जाते आणि त्यानंतर शहरातील आठ ते दहा ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला एकाच व्हॅनमधून फिरून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येते अशी माहिती मिळाली. आतापर्यंत तब्बल अडीच लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतलेला असून शहरातील प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.


शेअर करा