पुण्यातील मॉलमधून तरुणीचे अपहरण ?,  पोलिसांकडून वेगळाच संशय व्यक्त

शेअर करा

पुण्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून विमाननगर परिसरातील एका नामांकित मॉलमधून एका तरुणीचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे . नऊ लाख रुपयांची खंडणी द्या नाहीतर आम्ही या तरुणीचा खून करून टाकू अशी धमकी दिल्यानंतर तरुणीच्या वडिलांनी विमानतळ पोलिसात याप्रकरणी फिर्याद दिलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार व्यक्ती हे लातूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांची मुलगी पुण्यात शिक्षण घेते. विमाननगर परिसरात ती रहायला असून एका मॉलमधून तिचे अपहरण करण्यात आले आणि तिच्या वडिलांच्या मोबाईलवर नऊ लाख रुपये मागण्यात आले. पैसे दिले नाहीत तर तुमच्या मुलीला जिवे मारून टाकू अशी धमकी आरोपींनी दिली. 

हतबल झालेल्या तरुणीच्या वडिलांनी त्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. तरुणी प्रेमप्रकरणातून पळून गेल्याचा देखील संशय असून अद्यापपर्यंत निश्चितपणे समजलेले नाही. 


शेअर करा