शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी उद्धव ठाकरे यांचे आवाहन , पीक विम्यावरही म्हणाले की..

शेअर करा

राज्यात सध्या निव्वळ राजकीय धुमाकूळ सुरु असून रोज राजकीय पटलावर नवनवीन घटना घडत असल्या तरी सर्वसामान्य जनतेचे मात्र दुष्काळ आणि रोजगाराच्या अपुऱ्या संधीमुळे प्रचंड हाल आहेत अशा परिस्थितीत अत्यल्प पावसामुळे राज्यात सुरु असलेल्या दुष्काळामध्ये बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा . शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र उभारा आणि पिक विम्याचा आढावा घेऊन त्यांना मदत करा , असे आदेश शिवसेनेच्या उद्धव गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत.

मुंबई येथे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की , शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव ठेवा. पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. दिवसागणिक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता निम्म्यापेक्षा खाली आलेली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची उभी पिके नुकसानीत गेलेली आहेत. सुमारे 24 जिल्ह्यातील 890 महसूल परिमंडळात 25 दिवस पावसाने दांडी मारली होती त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

पिक विम्यासाठी केलेल्या अर्जांना कंपन्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत त्यामुळे शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रे उभारावीत. शेतकऱ्यांना पिक विमा मिळतो की नाही याची माहिती घेऊन तो मिळवून देण्यासाठी देखील प्रत्यक्ष जमिनीवर उतरून शेतकऱ्यांना मदत करा , असे देखील आवाहन त्यांनी शिवसेनेच्या उद्धव गटातल्या नेत्यांना केले आहे .


शेअर करा