… अन आमदार संग्राम जगताप भडकले, ‘ ह्या ‘ शब्दात केला संताप व्यक्त

शेअर करा

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे आज चांगलेच भडकलेले पहायला मिळाले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आपला संताप व्यक्त करताना, वारंवार मागणी करून नागरिकांचे प्रश्न सोडवले जात नसतील तर असे छोट छोटे प्रश्न विधानसभेत मांडायचे काय ? असे म्हणत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना आमदार जगताप यांच्यासमवेत बैठक घेण्यास सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज तब्बल सव्वा महिन्यानंतर नगरला आले होते. यावेळी त्यांनी विविध विभागाच्या आढावा बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत पालकमंत्री यांच्यासमोरच आमदार जगताप यांनी प्रशासनाचे वाभाडे काढताना अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

संताप व्यक्त करताना संग्राम जगताप म्हणाले, ‘सुपारी देऊन एखाद्याची हत्या करण्यापर्यंत जर नगर शहरात प्रकार घडत असतील तर हे अतिशय गंभीर आहे. नगर शहरापासून जवळच असणाऱ्या केडगाव उपनगरात सहा वाजण्याच्या सुमारास दरोड्याचे प्रकार होऊ लागले आहेत. सहा वाजताच स्वतःचे संरक्षण लोकांना करावे लागत असेल, तर ही गंभीर बाब आहे. याबाबतीत अनेक वेळा मी प्रशासनाला सांगितले. पण उपयोग झाला नाही. एवढे छोटे-मोठे प्रश्न आम्ही विधानसभेत मांडायचे का ? ‘

संग्राम जगताप पुढे म्हणाले, ‘ चार महिन्यापासून मोकाट जनावरांचा प्रश्न आहे. त्याकडे महापालिकेत वेळोवेळी तक्रार करून लक्ष दिले जात नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता मार्गी लागला जात नाही, हे देखील योग्य नाही,’ . पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना आमदार संग्राम जगताप यांचे उपस्थितीत बैठक घेण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे सांगण्यात आले आहे.

नगर महापालिकेच्या भोंगळ्या कारभाराचा प्रत्यय नागरिकांना रोजच येत असतो. कुणाचा कुणास मेळ नाही आणि आलेल्या नागरिकांना चार दरवाजे फिरून आणल्याशिवाय पालिका कर्मचाऱ्यांचे समाधान होत नसल्याचे चित्र नगर शहरात आहे . किरकोळ कामासाठी देखील नागरिकांना हेलपाटे मारून देखील कामे होत नाहीत अशा परिस्थितीत संग्राम जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे .


शेअर करा