बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्याकांडानंतर पुन्हा एकदा एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील एका मशिदीत बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धार्मिक वाद चिघळू नये यासाठी पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वैयक्तिक वादातून दोन तरुणांनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिलेले असून त्यामध्ये महाराष्ट्र ~ दर्मद्वेषाची जाती द्वेषाची प्रयोग शाळा तर होत चाललेली नाही ना ? याविषयी चिंता व्यक्त केलेली आहे.
काय आहे जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट ?
बीड जिल्ह्यातील एका मशिदीमध्ये स्फोट घडविण्यात आला, या प्रकरणात दोन तरूणांना पोलिसांनी अटकही केली आहे. आपल्या लक्षात येते की नाही, हे माहित नाही. पण, महाराष्ट्राचे रूपांतर आता धर्मद्वेषाच्या प्रयोगशाळेत केले जात आहे. गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात अशीच प्रयोगशाळा उघडून तिचा प्रयोग करण्यात आलेला आहे. आता महाराष्ट्र निशाण्यावर आहे. महाराष्ट्रातील संतपरंपरा, महाराष्ट्राचे पुरोगामित्व आणि महाराष्ट्राचे देशातील वेगळेपण उद्ध्वस्त करण्याचा हा कट आहे. कारण महाराष्ट्राने द्वेषाला कधीच स्थान दिले नाही, त्याचे सर्वात मोठे उदाहरण हे मुंबई आहे. कारण, मुंबईची माती ज्याने ज्याने आपल्या कपाळी लावली तो कधीच उपाशी झोपला नाही. हीच महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे. इथे जात, धर्म, पंथ, प्रांत हे बाजूला सारून लोकांनी एकमेकांसाठी जीव दिले आहेत. पण, आता जे काही घडतंय त्याची महाराष्ट्राला कधी ओळखच नव्हती. ही नवीन ओळख निर्माण केली जात आहे, महाराष्ट्राने त्यापासून सावध रहायला हवे.
आता प्रश्न उरतो त्या स्फोटाचा ! हा स्फोट ज्यांनी घडवून आणला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का? कारण, दोन समाजांत द्वेष निर्माण करणे, हे देशहिताचे नाहीच. त्यामुळे हे देशविघातक कृत्य आहे, हे आपण मान्य करायला हवे. मंदिरात स्फोट घडवणारा आणि मशिदीत स्फोट घडवणारा हे दोघेही या देशाचे शत्रूच आहेत. पण, महाराष्ट्रात वाढत चाललेला जातीय विद्वेष धार्मिक विद्वेष महाराष्ट्राच्या हिताचा नक्कीच नाही. जितेंद्र आव्हाड