दारूबंदीसाठी गावात प्रयत्न करणाऱ्या वकिलालाच मारहाण ? ,वकिलासह कुटुंबियांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर उपोषण

शेअर करा

पारनेर तालुक्यातील देवी भोयरे गावातील दारूबंदीसाठी प्रयत्नशील असलेल्या एका  वकिलालाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा आरोप संबंधित वकील आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेला असून पारनेर पोलिसांच्या विरोधात त्यांनी खळबळजनक असे आरोप केलेले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर त्यांनी तीन दिवसांपासून उपोषण सुरू केलेले असून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार एडवोकेट नितेश जयवंत गायकवाड ( राहणार देवीभोयरे तालुका पारनेर ) असे उपोषण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील उपोषणात सहभागी झाले आहे. देवीभोयरे येथील अवैध दारू बंद होणेबाबत त्यांनी अनेकदा तक्रार केली मात्र त्यानंतर पोलिसांनी पंचनाम्याचा बहाना करत आपल्यालाच खोट्या गुन्ह्यात अडकवले. ज्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही अशा दारूच्या प्रकरणात आपल्याला बेदम मारहाण केली. आपल्या भावाला देखील पारनेर पोलिसांनी सरकारी वाहनांमध्ये घेऊन जात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये येथे गेल्यावर मारहाण केली , असे म्हटले आहे. 

पारनेर पोलिसांनी गुन्हा कबूल करण्यासाठी धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी नितेश गायकवाड आणि त्यांचे भाऊ यांना मारहाण केली असा दावा कुटुंबीयांनी केलेला आहे. ‘ गावात दारू सुरू राहिली तर तुझ्या आई बापाचे काही जाणार आहे का ?. आम्ही हप्ते घेतो त्याचा तुला काय त्रास होतो ? . तुला जास्त त्रास होत असेल तर तू गाव सोडून जा ‘  असे म्हणत शिवीगाळ केल्याचा देखील दावा त्यांनी केलेला आहे. पारनेर पोलिसांनी स्वतः दारूचे फुगे आणून टाकले आणि त्यानंतर आपल्यालाच खोट्या प्रकरणात अडकवले असाही आरोप संबंधित वकिलांनी केलेला आहे. 

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर एडवोकेट नितेश गायकवाड यांनी कुटुंबीयांसोबत उपोषणाला सुरुवात केलेली असून पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासोबत शामसुंदर विश्वनाथ गुजर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि राजरोसपणे देवीभोयरे इथे दारूविक्री करणाऱ्या व्यक्तींवर तडीपारची कारवाई करावी. जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हटणार नाही असा देखील इशारा त्यांनी दिला आहे. 


शेअर करा