लाचखोर उपायुक्त वैभव साबळेचा आणखी एक कारनामा समोर, पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर.. 

शेअर करा

सर्वच महापालिकेचे नगररचना विभाग बांधकाम परवानगी देताना मोठ्या आर्थिक तडाजोडी करून या परवानगी दिल्या जात असल्याचे सर्रास चित्र महाराष्ट्रात आहे. सांगली येथे बांधकाम परवाना प्रकरणी लाच घेणे मनपा उपायुक्तांना महागात पडलेले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई तो अडकला आहे.

सांगलीत २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी ७ लाखांची लाच मागितल्याबद्दल महापालिका उपायुक्त वैभव विजय साबळे (वय ३१, रा. ग्रीन एकर्स, फ्लॅट नं. ४०३, धामणी रस्ता, सांगली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. 

सामाजिक कार्यकर्ते तथा आप नेते विजय कुंभार यांनी साबळे हा एमपीएससी परीक्षा “कर्णबधीर” असल्याचं खोटं प्रमाणपत्र लावून पास केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 1993 साली ज्या दिवशी जन्म झाला, त्याच दिवशीच त्याला कर्णबधीर असल्याचं सर्टिफिकेट मिळालं!. पूजा खेडकर प्रकरण उघड झाल्यानंतरच साबळेने शोभेच्या श्रवण यंत्राचा वापर सुरू केला. लोकांच्या तक्रारींच्या ढिगाऱ्यानंतरही यंत्रणेला जाग आली नाही. का ? कारण बहुतेक याच यंत्रणेतील अनेक लोकही हाच फसवेगिरीचा मार्ग वापरूनच सेवेत आले आहेत, असंही कुंभार म्हणाले आहेत.

तक्रारदार तानाजी रूईकर (रा. मिरज) यांच्या कंपनीने सांगलीतील सी.के. असोसिएटस् यांच्या २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना घेण्यासाठी महापालिकेत प्रस्ताव दिला होता त्यासाठी उपायुक्त साबळे याने वरिष्ठांचे नाव सांगून १० लाख रूपये मागितले म्हणून रूईकर यांनी दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार अर्ज केला. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली तेव्हा उपायुक्त साबळे याने तक्रारदार रूईकर यांच्याकडे बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी दहा लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७ लाख रूपये स्विकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर घडलेल्या घडामोडीनंतर प्रत्यक्षात ७ लाख रूपये लाच स्विकारली नाही परंतू त्याने ७ लाखाची लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्यामुळे त्याच्याविरूद्ध कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला.

दरम्यान वरिष्ठ कार्यालयाने पडताळणी केल्यानंतर उपायुक्त साबळे याच्याविरूद्ध कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार नूतन उपअधीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी महापालिकेतून साबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. लाचेच्या मागणीच्या कारवाईनंतर साबळे याच्या सातारा व सांगलीतील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सायंकाळी झडती घेतली.

उपअधीक्षक कटके, निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलिम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पाेपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमाेडे, सीमा माने, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.


शेअर करा