सदैव तुमच्यासाठी तुमच्याच सोबत , ५० जेसीबी अन २२ डंपर घेऊन निलेश लंकेचं काय चाललंय ? 

शेअर करा

अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे तसेच अनेक घरांचे देखील नुकसान झालेले आहे. प्रशासकीय पातळीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतानाच खासदार निलेश लंके यांनी तात्काळ जनतेत उतरून मदतीला सुरुवात केलेली आहे. जेसीबी , पोकलेन आणि डंपरच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचे काम निलेश लंके करत असून त्यांनी यासंदर्भातील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहे. 

फेसबुकवरील पोस्टमध्ये निलेश लंके म्हणतात की ,’ आपत्तीमध्ये एक मदतीचा हात….मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अकोळनेर, वाळकी, खडकी, अस्तगाव, सारोळा कासार, भोरवाडी, जाधववाडी, सोनेवाडी या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. रस्ते आणि पूल वाहून गेले, जनावरांचा मृत्यू झाला, घरांमध्ये पाणी घुसले. अनेकांचे संसार उघड्यावर आले.

मी स्वतः या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तत्काळ निलेश लंके प्रतिष्ठान व ‘आपला मावळा’ संघटना यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन मोहीम सुरू केली यावेळी अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले ते रस्ते पुन्हा पुनर्वत करून चालू करण्यात आले. वाहून आलेल्या मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यात आली. 

वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी शिरल्यामुळे तेथे भरपूर प्रमाणात गाळ साचला होता. मी स्वतः खोरे हातात घेऊन व माझ्या सहकाऱ्यांनी अग्निशामक दलाच्या मदतीने 5 तासाच्या अथक परिश्रमाने गाळ हटवला आणि आरोग्य केंद्र पुन्हा कार्यरत केलं.

यावेळी प्रत्येक गावात रूग्णांसाठी निलेश लंके प्रतिष्ठानची रूग्णवाहिकेची सोय करण्यात आली. 35 डॉक्टरांची टीम गावोगावी जाऊन तपासणी व औषध वाटप करण्यात आली. जनावरांसाठी पशुवैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले. भोरवाडीतील एका शेतकऱ्याच्या गायीच्या गर्भात अडथळा आला होता. आमच्या डॉक्टरांनी वेळेवर मदत करून गाय आणि वासराचे प्राण वाचवले.

खालील ठिकाणी मदत व पुनर्बांधणीची प्रमुख कामे करण्यात आली.

✔️ अकोळनेर – महेत्रे वस्ती, जाधववाडी, दरोडी मळा येथे पूल व रस्ते

✔️ वाळकी – नदीकिनारी भराव, जंदरे वस्तीचे रस्ते

✔️ भोरवाडी – नवीन खडकवाडी पूल पुन्हा बांधला

✔️ सारोळा कासार – काळेवस्ती, दत्तमंदिर रस्ते आणि स्मशानभूमी दुरुस्ती

✔️ खडकी – जाधववस्ती रस्ता पुन्हा खुला

✔️ अस्तगाव – वस्ती भागात वाहून गेलेले रस्ते पुन्हा तयार

आपत्ती आली खरी, पण एकजुटीने आपण तिचा सामना करू शकलो.

सेवा आणि संवेदना याला माझ्या कार्यात सर्वोच्च स्थान आहे. ही मदतमोहीम लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य समजून पार पाडली. यावेळी मदत कार्यात ५० जेसीबी, २२ डंपर, ३० ट्रॅक्टर, ५ पोकलेन, ४०० स्वयंसेवक आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपले सहकार्य माझ्यासाठी खूप अनमोल आहे. सदैव तुमच्यासाठी, तुमच्याच सोबत.


शेअर करा