मुकेश अंबानींच्या घरासमोरील गाडीतील स्फोटकांचे नागपूर ‘ कनेक्शन ‘ आले समोर

शेअर करा

मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर खळबळ उडाली. ही कार रोडवर अंबानी यांच्या ‘अ‍ॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ उभी करण्यात आली होती. गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या स्फोटकांचं नागपूर कनेक्शन समोर आलं आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कारमधील जिलेटीनच्या कांड्या नागपूर येथील इकॉनोमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली आहे. सोलर एक्स्प्लोझिव्ह ही जगातील चौथी मोठी स्फोटक तयार करणारी कंपनी आहे. विहीर खोदणे आणि खाण कामासाठी ही स्फोटकं प्रामुख्याने पुरविली जातात. सोलर इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी यासंबंधी मुंबई पोलिसांनी माहिती दिल्याचे सांगितले.

“गुरूवारी मध्यरात्री १.३० वाजता मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन आला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या सोलर एक्सप्लोझिव्ह मध्ये तयार झाल्या आहेत. अशी माहिती या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली’, असे सत्यनारायण नुवाल यांनी सांगितले.

सोलार इंडस्ट्रीजकडून ज्या ज्या लोकांना जिलेटीन दिले गेलंय याची माहिती मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे. ‘ आमच्या प्रोडक्टला जर कुणाची मागणी आली तर तर ती एक्सप्लोजीव डिपार्टमेंटला येते आणि नंतर त्यांच्या थ्रू ती आमच्याकडे येते, त्यामुळे आमच्याकडे सगळे रेकॉर्ड असतात. आम्ही आतापर्यंत ज्या ज्या लोकांना जिलेटीन दिलंय, त्यांची माहिती आम्ही पोलिसांनी दिली आहे ” असं कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी सांगितलं.

दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास संशयित गाडी आढळली होती. अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडीत काही स्फोटके सापडली. संशयास्पदरित्या स्फोटक भरुन आलेली ही गाडी विक्रोळी इथून चोरी झाल्याची माहिती आता समोर येत आहे. सात ते आठ दिवसांपूर्वी ही गाडी चोरी झाली होती, अशी माहिती आहे. तशी तक्रार ही विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या गाडीत स्फोटकांच्या बॅगसोबत एक पत्रही पोलिसांनी मिळाले. या पत्रातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने….संभल जाना…’, असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बुधवारी मध्यरात्री एक वाजता स्कॉर्पिओ आणि इनोव्हा अशा दोन गाड्या आल्या होत्या. एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून ही गोष्ट समोर आली होती. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्यानंतर चालक गाडीतून उतरला आणि इनोव्हा गाडीत बसून निघून गेला. या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या गाडीत काही नंबरप्लेटसही मिळाल्या. या नंबरप्लेटस नक्की कशासाठी होत्या याचा उलगडा होऊ शकलेला नाही.


शेअर करा