तुमची मुलगी माझी होणारी बायको आहे, मुलीचे घरातून केले अपहरण : महाराष्ट्रातील घटना

शेअर करा

पोलीस यंत्रणा कोरोनाच्या रोकथामासाठी व्यग्र असताना दुसरीकडे राज्यात गुंड सोकावत चालल्याचे चित्र आहे . विशेषतः जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे तिथे पोलीस यंत्रणा जास्त व्यस्त असल्याने अशा ठिकाणीच गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या तीन महिन्यात जास्त वाढल्याचे दिसून आले आहे .

नागपूर शहरात असाच एक प्रकार घडला आहे. २२ वर्षीय गुंडाने मुलीच्या आईला चाकूचा धाक दाखवून मुलीचे अपहरण केले. ‘ तुमची मुलगी माझी होणारी बायको आहे’ असे सांगून त्याने मुलीच्या आईला चाकूचा धाक दाखवला आणि मुलीला पळवून नेले. मुलीच्या आईने त्यानंतर एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली. बाका ऊर्फ आकाश सहारे (वय २२, रा. इसासनी) असे ह्या गुंडांचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे . आकाशविरुद्ध याआधी देखील घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

इसासनी भागात राहणारी मुलगी दहावीच्या वर्गात शिकत असून गुंड प्रवृत्तीच्या आकाश सहारे (वय २२, रा. इसासनी) याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते . दोघांच्या गाठीभेटी वाढल्याने परिसरात याची चर्चा होऊ लागली. त्यानंतर मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर मुलीला मामाच्या गावी पाठवण्याचे ठरले होते. ही माहिती मुलीने आकाशला सांगितली. त्यानंतर आकाश संतापला आणि धडक मुलीच्या घरी पोहचला.

मुलीच्या घरी पोहचल्यानंतर मुलीच्या आईचा आणि त्याचा वाद झाला. ‘तुमची मुलगी माझी होणारी बायको आहे, तिला काही केल्यास याद राखा,’ अशी धमकी देऊन त्याने मुलीच्या आईला चाकूचा धाक दाखवत मुलीचे अपहरण केले. मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आकाशविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे .


शेअर करा