..अन अखेर नगरच्या पेट्रोल पंपावरील ‘ तो ‘ मॅनेजर ताब्यात

शेअर करा

नगर शहरातील मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन येथे असलेला दीपक पेट्रोल पंप येथे तब्बल दहा लाख 37 हजार रुपयांची रक्कम पेट्रोल पंपाचा मॅनेजर असलेल्या व्यक्तीने लंपास केली होती त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांच्या आत त्याला जेरबंद केले आहे. अगस्तीन जॉर्ज गोन्साल्विस ( वय 38 राहणार तारकपूर ) असे त्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अनिल भोलानाथ जोशी ( राहणार मेघराज कॉलनी सावेडी ) यांचा नगर मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन येथे एक पेट्रोलपंप आहे. हा पंप शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहकांची देखील गर्दी असते म्हणून पेट्रोल पंपाचा हिशोब करण्यासाठी आणि रोजची रोकड सांभाळण्यासाठी जोशी यांनी ऑगस्टीन जॉर्ज गोन्साल्विस याला कामाला घेतले होते. फिर्यादी जोशी यांनी पेट्रोल पंपावर जमा झालेली नऊ लाख 97 हजार 384 रुपयांची रक्कम आणि कामगारांचे पगार असे जवळपास दहा लाख रुपये बँकेत भरण्यासाठी गोन्साल्विस याच्याकडे दिले होते.

आपल्या हातात तब्बल दहा लाख रुपये आल्यानंतर गोन्साल्विस याची नियत फिरली आणि त्याने ही रक्कम बँकेत न भरता परस्पर लंपास केली. आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याप्रकरणी तात्काळ कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत त्याला जेरबंद केले. सदर कारवाईबद्दल पोलिसांचे परिसरात कौतुक केले जात आहे.


शेअर करा