अशोक कटारिया ‘ ह्या ‘ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत , पासपोर्ट जप्तीची नितांत गरज

शेअर करा

नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार आणि कर्ज घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बँकेचे माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारिया यांना आळेफाटा येथून अटक केली होती. न्यायालयाने त्यांना तीन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. ठेवीदारांचा सतत पाठपुरावा आणि न्यायालयाकडून पोलिसांना देण्यात आलेल्या कानपिचक्या यामुळे कारवाईला आता गती आलेली दिसून येत आहे. 

नगर अर्बन बँकेतील कर्ज घोटाळा आणि गैरव्यवहार याची रक्कम सुमारे दीडशे कोटी पर्यंत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मात्र फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ही रक्कम जवळपास त्याच्या दुप्पट म्हणजे 291 कोटी पर्यंत पोहोचलेली आहे. आत्तापर्यंत यामध्ये 102 आरोपी असून त्यातील अवघ्या पाचच जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेली आहे. न्यायालयाने पोलिसांना कारवाईबद्दल धारेवर धरले अन त्यानंतर तपासाला गती मिळाली आहे. 

बँकेचे माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना अटक केल्यानंतर विशेष न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यासमोर हजर केलेले होते त्यावेळी सरकारी वकील मंगेश दिवाने आणि खेडकर यांनी बाजू मांडली तर आरोपींच्या वतीने वकील महेश तवले आणि संजय दुशिंग यांनी युक्तिवाद केलेला होता.. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कटारिया यांना 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अटकेच्या कारवाईने केवळ पोलिसांमार्फत न्यायालयाचे समाधान होईल मात्र आमच्या ठेवी आम्हाला परत मिळतील तेव्हाच आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असे म्हटलेले आहे. 

फरार झालेल्या इतर आरोपींचा तात्काळ शोध घेऊन तसेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पासपोर्ट जमा करून परदेशात जाण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडावा अशी देखील भूमिका ठेवीदारांनी घेतलेली असून एकदा परदेशात पळाल्यानंतर आरोपी लवकर हाती येणार नाहीत आणि त्यासाठीची प्रक्रिया किचकट असेल म्हणून आर्थिक गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई केवळ न्यायालयाच्या समाधानासाठी नव्हे तर ठेवीदारांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने करावी अशी विनंती देखील ठेविदारांकडून करण्यात आलेली आहे. 

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी भेट घेतल्यानंतर तपासाला गती मिळालेली असून या प्रकरणातील मुख्य आरोपीला अर्थात घोटाळ्याच्या मास्टर माईंडला मात्र अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. अशोक कटारिया यांना अटक केल्यानंतर पारनेर तालुक्यात देखील खळबळ उडाली असून अशोक कटारिया यांच्या पाठोपाठ इतर आरोपींना देखील ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.  घोटाळ्यातील आरोपींची संख्या तब्बल 102 असून आत्तापर्यंत केवळ पाचच व्यक्ती यांना अटक करण्यात आलेली आहे त्यात दोन व्यक्तींनी शाखा अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे तर इतर माजी संचालक आहेत. 

अशोक कटारिया हे सुरेंद्र गांधी यांच्या कुटुंबियांचे निकटवर्तीय असून बँकेचा रिझर्व परवाना रद्द केला त्यावेळी तेच बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते . 26 जानेवारीला भाजपचा माजी नगरसेवक आणि बँकेचा माजी संचालक मनेष साठे आणि नगर अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष अनिल कोठारी या दोघांना अटक करण्यात आलेली होती . भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र असलेले नगरसेवक सुरेंद्र गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोरील अडचणी कटारिया यांच्या अटकेनंतर वाढलेल्या आहेत. अटक होण्याची भीती असल्याकारणाने गांधी कुटुंबीय देखील सध्या नगरमध्ये नसल्याची चर्चा असून नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी हे ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. 

नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी यांनी , ‘ आपल्याला यापूर्वी अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत तसेच आपल्यावर पाळत ठेवण्याचे देखील प्रकार घडलेले आहेत मात्र अशा प्रकारांना आपण भीक घालत नाही ‘, असे देखील त्यांनी ठणकावले आहे .102 आरोपींमध्ये अनेक व्यक्ती हे आर्थिकदृष्ट्या सधन असून कारवाई टाळण्यासाठी परदेशात पलायन करण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे अशा व्यक्तींचे पासपोर्ट तात्काळ जप्त करण्याची देखील मागणी अनेकदा ठेवीदारांनी केलेली आहे. 


शेअर करा