विखे पाटलांच्या संस्थेला पण लाचखोर सोडेनात , सापळा रचला अन..

शेअर करा

नगर जिल्ह्यात लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या मॅनेजरकडून दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एका व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे. श्रीरामपूर कार्यालयातील वजन मापे निरीक्षक वर्ग दोन म्हणून काम करणारा व्यक्ती दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आला आहे . 

उपलब्ध माहितीनुसार , अशोक श्रीपती गायकवाड असे या अधिकाऱ्याचे नाव असून प्रवरानगर इथे सोमवारी 29 तारखेला ही कारवाई करण्यात आलेली आहे . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलेली असून आरोपीच्या विरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्था प्रवरानगर इथे असून संस्थेच्या माध्यमातून भारत पेट्रोलियम कंपनीचा एक पेट्रोल पंप चालवला जातो. या पंपाची वार्षिक तपासणी करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी अशोक गायकवाड याने 12 हजार रुपये लाचेची मागणी केलेली होती. 

संस्थेचे मॅनेजर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार केली आणि आरोपीने दहा हजार रुपयांवर तडजोड करण्याचे ठरवले . सदर पंपावर दहा हजार रुपयांची लाच घेताना अशोक गायकवाड याला रंगेहात पकडण्यात आलेले आहे . नाशिकच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर , अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,  पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार , अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. 


शेअर करा