विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल , सोनई पोलिसांकडून चौघांना अटक

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथे समोर आलेला असून तीस वर्षीय विवाहितेने मुळा कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. सोनई पोलिसात याप्रकरणी पती दीर सासू-सासरे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , मोनिका रामकृष्ण पटारे ( वय तीस वर्ष ) असे मयत महिलेचे नाव असून पिकअप गाडी घेण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये घेऊन ये असा त्रास तिला तिचा पती रामकृष्ण पटारे , सासरा शिवाजी पटारे, सासू शांताबाई पटारे , दीर अनिल पटारे हे देत होते असा मयत महिलेचे वडील राजेंद्र वालतुरे यांचा आरोप असून सोनई पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. 

27 जानेवारी रोजी देडगाव कालव्यामध्ये मोनिका यांचा मृतदेह आढळून आलेला होता. सासरच्या आणि माहेरच्या व्यक्तींमध्ये प्रचंड कलह असून पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी पार पाडण्यात आलेला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके याप्रकरणी पुढील तपास करत असल्याची माहिती आहे. 


शेअर करा