अन प्रजापती याचा फोन स्विच ऑफ आला , व्यावसायिकाची पोलिसात धाव

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक फसवणुकीचा भलताच प्रकार समोर आलेला असून जामखेड शहरात एका कापड व्यावसायिकाला तब्बल तीन जणांनी आठ लाख रुपयांचे बनावट सोने देऊन गंडा घातला आहे. जामखेड पोलिसात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , गणेश महादेव खेत्रे ( वय तीस वर्ष राहणार महादेव गल्ली जामखेड ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून जामखेड मधील भाजप कार्यालय शेजारी गणेश खेत्रे यांचे कपड्याचे दुकान आहे . 

काही महिन्यांपूर्वी एक महिला आणि दोन अनोळखी इसम कपडे खरेदी करण्यासाठी आलेले होते त्यावेळी ओळख झाल्यानंतर आमच्याकडे सोन्याच्या जुन्या वस्तू आहेत असे सांगत फिर्यादी यांना त्यांनी जाळ्यात ओढले आणि आपल्याकडे स्वस्तात सोने आहे असे देखील त्यांना भासवले. 

आरोपींपैकी प्रजापती नावाचा एक व्यक्ती खेत्रे यांना सतत फोन करायचा त्यावेळी आमच्याकडे आणखीन जुन्या सोन्याच्या वस्तू आहेत. दहा लाख रुपयात तुम्ही विकत घ्या असे देखील फिर्यादीस त्याने सांगितलेले होते. आरोपी त्यानंतर 24 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता एक महिला आणि एक पुरुष यांच्यासोबत फिर्यादी यांना भेटला आणि सोन्याचे मनी असलेला माळाचा गुच्छ दिला . फिर्यादी यांनी त्यांना त्या बदल्यात आठ लाख रुपये दिले. 

फिर्यादी यांनी त्यानंतर सोन्याचे मनी असलेला माळाचा गुच्छ सराफाच्या दुकानात तपासणीसाठी नेला त्यावेळी ते सोने बनावट असल्याचे समोर आले. प्रजापती याचा फोन लावला तर फोन बंद आढळून आला त्यावेळी आपली फसवणूक झाल्याची जाणीव खेत्रे यांना झाली आणि त्यांनी जामखेड पोलिसात तीन जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवलेला आहे. 


शेअर करा