‘ नॉट रिचेबल ‘ आरोपींसोबत नातेवाईक अन नाजूक नात्यातील व्यक्तींचाही तपास गरजेचा

शेअर करा

नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी असलेल्या माजी संचालकांच्या मालमत्ता बाबतची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मागविण्यात आलेली असून तसे पत्र आर्थिक गुन्हे शाखेने विभागाला पाठवले आहे. माजी संचालकांची मालमत्ता हाती आल्यानंतर त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आणि त्यांनी कमावलेली मालमत्ता याची सांगड जुळवणे आर्थिक गुन्हे शाखेला सोपे होणार असून नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात आता तपासाला गती आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेला गैरव्यवहार प्रकरणात पत्नी , पत्नीचा भाऊ , सासू , सासरा तसेच इतर जवळचे नातेवाईक यांच्या नावावर असलेल्या संपत्तीची देखील शहानिशा करणे नितांत गरजेचे आहे कारण अनेकदा बेकायदा पद्धतीने कमावलेली संपत्ती जवळच्या नातेवाईकांच्या नावावर केली जाते. 

नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात माजी अध्यक्ष अशोक कटारियासह आणखीन दोन माजी संचालकांना अटक करण्यात आलेली असून त्यांची देखील चौकशी सध्या सुरू आहे . तब्बल 102 आरोपींची संख्या असून आत्तापर्यंत केवळ पाचच जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सुरुवातीला दीडशे कोटींचा घोटाळा असल्याचा ही फिर्याद होती मात्र फॉरेन्सिक ऑडिटमध्ये हा आकडा तब्बल 291 कोटींचा असल्याचे समोर आलेले आहे. 

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर अनेकदा आंदोलने केली रास्ता रोको देखील केले त्यानंतर महसूल मंत्री विखे पाटील यांची भेट घेतल्यानंतर सोबतच कोर्टाने देखील पोलिसांची कानउघाडणी केली त्यानंतर तपासाला गती आलेली आहे . कुणाचा कसा या गैरव्यवहारात सहभाग आहे यासाठी पोलिसांनी आता आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागवलेली आहे. 

सदर व्यवहारातील अनेक आरोपींनी मिळवलेली संपत्ती ही गैरव्यवहारातून आलेली असल्याचा आर्थिक गुन्हे शाखेचा अंदाज असून त्या अनुषंगाने आता या प्रकरणातील संशयित आरोपी तसेच त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्या देखील संपत्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.  आरोपींनी अनेक मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत अशी ठेवीदारांमध्ये चर्चा असून मालमत्ता खरेदी-विक्रीची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात असते त्यामुळे आता आरोपींचे धाबे दणाणले आहे. अनेक संचालक अटकेच्या भीतीने नॉट रिचेबल झालेले आहेत. 


शेअर करा