‘ पर्मनंट खासदार ‘ , सुजय विखेंच्या समर्थकांमध्ये हा अहंकार येतो कुठून ? 

शेअर करा

‘ परमनंट खासदार ‘ चे काही फलक नगरमध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी महायुतीचा उमेदवारीचा फॉर्म भरला त्यावेळी झळकले होते. लोकशाहीमध्ये जनता सर्वश्रेष्ठ आहे मात्र ‘ सुजय विखे यांना परमनंट खासदार कोणी ठरवले याचे उत्तर अंधभक्त आणि सुजय विखे यांचे मतदारच नक्की सांगू शकतील. भाजपचा ‘ अबकी बार चारसो पार ‘ चा नारा हा देखील अशाच प्रकारातला असून जनतेला भाजपनं गृहीत धरलेले आहे का ? किंवा ही मुजोरी ईव्हीएमच्या भरवशावर आहे ? असाही  प्रश्न यामुळे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही .

लोकशाही मूल्यांची सातत्याने पायमल्ली करायची , धार्मिक आधारावर मतदारांना वेठीस धरायचं , मतदार कुठेही जाणार नाही यासाठी कुठल्याही थराला जाऊन राजकारण करायचे असे प्रकार भाजप सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोज समोर येत आहेत. सुरतमधील काँग्रेस उमेदवाराचा झालेला पराभव हा अशा कार्यपद्धतीचा उत्तम नमुना आहे. 

विखे कुटुंबीय यांचे नगर जिल्ह्यासाठी योगदान आहे याबद्दल कोणी नाकारू शकत नाही मात्र ‘ परमनंट खासदार ‘  हे मात्र अतिच होतं. हा शब्द नक्की कुणाच्या सुपिक डोक्यातून उपजलाय हे समजायला मार्ग नाही कारण लोकशाहीमध्ये काहीच परमनंट नाही. मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागलेला आहे अशा परिस्थितीत परमनंट खासदार असे म्हणून मतदारांचीच चेष्टा सुजय विखे यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे का ?  असा प्रश्न यामुळे पडल्याशिवाय राहत नाही. 

हनुमान जयंतीचे औचित्य साधत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र हिंदुत्वाचा डांगोरा पेटणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला याचे सोयरसुतक नसावे यावरूनच भाजपचे हिंदुत्व किती बेगडी आहे हे स्पष्ट झाल्याशिवाय राहत नाही.   ‘ परमनंट खासदार ‘ हा शब्द मुळातच लोकशाहीला धरून नसून नगरची जनता ही काही विखे कुटुंबाची खाजगी मालमत्ता नाही याचे भान ठेवत सुजय विखे यांनी त्यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरण्याची नितांत गरज आहे.  

सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी संपूर्ण शहरात निम्मे रस्ते बंद होते नागरिकांची गैरसोय झाली. अनेक जणांचे रोजगार बुडाले तर दुसरीकडे सभेला पैसे देऊन आणलेल्या नागरिकांच्या पैशावरून वाद झाल्याची व्हिडिओ देखील व्हायरल झाले.  भाजपच्या पायाखालील वाळू सरकायला लागलेली आहे का ? की भांबलेल्या भाजपच्या उमेदवाराला सध्या नेमके काय करावे याचे भान राहिलेले नाही इतपत शंका यावी अशा पद्धतीने घटनाक्रम सध्या घडत आहेत. एक गोष्ट मात्र नक्की निलेश लंके यांनी पिढ्यानपिढ्या सत्ता गाजवलेल्या सत्ताधाऱ्यांना मात्र घाम फोडलेला आहे. 


शेअर करा