मागील लोकसभेत नगरकरांनी तुम्हाला ‘ लेव्हल ‘ दाखवली , 2019 ला कुणाला किती मते ? 

शेअर करा

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी निवडणूक अर्ज भरला त्यावेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी आमदार निलेश लंके यांच्याबद्दल बोलताना ,’ समोरील उमेदवाराची काही लेव्हलचं नाही ‘ असे वक्तव्य केलेले होते. त्यांच्या या विधानाचा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून चांगलाच समाचार घेण्यात आलेला असून मागील वेळी खासदारकीच्या निवडणुकीत संग्राम जगताप यांना नगरकरांनी त्यांची लेव्हल दाखवली होती असा हल्लाबोल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते अभिषेक कळमकर यांनी केलेला आहे. 

अभिषेक कळमकर म्हणाले की , ‘ खासदारकीच्या मागील निवडणुकीत नगरकरांनी संग्राम जगताप यांना त्यांची लेव्हल दाखवलेली आहे. सद्य परिस्थितीत केवळ महायुतीच्या उमेदवाराच्या समोर आपण खूप काही त्यांचे काम करतो आहे असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न विद्यमान आमदार संग्राम जगताप करत आहेत मात्र लंके यांच्याबद्दलचे त्यांचे हे वक्तव्य वैफल्यातून आलेले आहे. नगर शहरात विक्रमी मते मिळवून निलेश लंके हेच विजयी होतील असा विश्वास अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केलेला आहे. 

दुसरीकडे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी देखील सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित असलेल्या नेत्यांवर निशाणा साधलेला असून ज्यांच्यावर पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ले केल्याचे गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांसोबत सभेला हजेरी लावल्याविषयी चिंता व्यक्त केलेली आहे.

2019 मध्ये खासदारकीच्या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांचा दारुण पराभव झालेला होता तर भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी सात लाख चार हजार सहाशे साठ मते मिळवली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर संग्राम जगताप यांना चार लाख 23 हजार 186 मते मिळालेली होती. भाजप उमेदवार सुजय विखे यांनी जवळजवळ तीन लाखांच्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकलेली होती मात्र त्यानंतर सुजय विखे यांच्यासोबत संग्राम जगताप यांनी जुळवून घेतले आणि आमदारकीच्या निवडणुकीत बाजी मारली.


शेअर करा