अखेर ‘ बर्ड फ्ल्यू ‘ महाराष्ट्रातील ‘ ह्या ‘ जिल्ह्यात झाला दाखल, आरोग्यमंत्री म्हणाले की..

शेअर करा

करोनाला हद्दपार करण्यासाठी लवकरच लसीकरण सुरू होत असताना राज्यासमोर बर्ड फ्लूच्या रूपानं नवं संकट उभं ठाकलं आहे. राज्यातील पाच जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या ठिकाणी बर्ड फ्लूच्या विषाणूनं शिरकाव केला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केले असून राज्यात हाय अलर्ट घोषित करण्याची गरज आहे, असं मत मांडलं आहे.

जालन्यात आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘बर्ड फ्लू हा अत्यंत धोकादायक आजार असून या आजाराचा मृत्यू दर १० ते १२ टक्के आहे. हे लक्षात घेता ‘बर्ड फ्लू’बाबत जास्तीत जास्त सावधानता बाळगणं गरजेचं आहे. त्यासाठी राज्यात हाय अलर्ट जारी करायला हवा. पशुसंवर्धन व आरोग्य विभागानं तातडीनं उपाययोजना सुरू करायला हव्यात, असंही त्यांनी सांगितलं.

परभणीतील मुरुंबा गावात बर्ड फ्लूमुळं ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून या गावाच्या एक किलोमीटरच्या परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. जेसीबीच्या मदतीनं खड्डा खणून कोंबड्या पुरण्यात येणार आहेत. परभणीबरोबर मुंबई, ठाणे, बीडसह इतर जिल्ह्यात मृत पक्षी आढळून आले होते. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, प्रशासनाकडून पाच जिल्ह्यात बर्ड फ्लूनं शिरकाव केला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे रविवारी २६ कावळे मृतावस्थेत आढळले होते. तीन कावळ्यांचे अवशेष भोपाळला तर अन्य काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले होते. तर मुंबईतील चेंबूर परिसरातील टाटा कॉलनीजवळ नऊ कावळे रविवारी मृतावस्थेत आढळले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. रत्नागिरीतील दापोली इथे देखील कावळ्याचा मृत्यू झाला होता.

मुंबई, ठाण्यात कावळे व पोपट बर्ड फ्लूनं मरण पावले आहेत. कोंबड्यांच्या बाबतीत खबरदारी घेणं तुलनेनं सोपं असलं तरी कावळे व पोपटांचा संचार कसा रोखणार, असा नवीन प्रश्न आता उभा राहिला आहे. बीड आणि परभणीतील मुरुंबा गावात कोंबड्याचा मृत्यू झाला होता. भोपाळच्या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रत्नागिरीतील दापोली आणि मुंबईतील चेंबूरमधील कावळ्यांचा आणि ठाण्यातील पोपटांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचंही प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात नमूद केलं आहे.


शेअर करा