‘ मी सांगितलं होतं का ? ‘ , अजितदादा पत्रकारांवरच भडकले

शेअर करा

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या गुरुवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लागले आहेत मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनीही अजितदादांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावले आहेत. याबाबत विचारण्यात आलं असता अजितदादा पत्रकारांवरच भडकले. गुन्हेगारांना मी होर्डिंग्ज लावायला सांगितल्या होत्या का?, असा उलट सवालच अजितदादांनी पत्रकारांना केला.

अजित पवार यांचा उद्या वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज शहरात लागले आहेत. अजितदादांनी मनाई करूनही हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनीही शुभेच्छांचे होर्डिंग्ज लावले आहेत. त्याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आले. खासकरून गुन्हेगारांच्या होर्डिंग्जकडे त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावेळी अजितदादा चांगलेच भडकले. गुन्हेगारांना होर्डिंग्ज लावायला मी सांगितलं होतं का? वाढदिवसानिमित्ताने होर्डिंग्ज लावू नका, बॅनरबाजी करू नका, असं आवाहन मी केलं होतं. माझ्या सद्सदविवेकबुद्धिला स्मरून मी हे आवाहन केलं होतं. उद्याच्याला कोणी काय केलं ते चुकीचं असेल तर पोलिसांनी अॅक्शन घ्यावी. त्यांना कारवाईसाठी कधीच बंदी केलेली नाही, असं अजितदादा म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये मी आज येत नाही महाराज, मी अनेक वर्षांपासून येतो. पिंपरी चिंचडवकरांना माझी सर्व मते स्पष्टपणे माहीत आहेत. तुम्ही काही तरी नवी गोष्ट काढण्यासाठी कोणता तरी मुद्दा सोडायचा आणि प्रश्न विचारायचे हे धंदे बंद करा, असा दम भरतानाच अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितलं नाही. एक मिनिट… मी नियमांचं पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीची लागले असेल तर भाजपची सत्ता आहे. आयुक्त महापौरांनी किंवा शहराचं कामकाज ज्यांच्या हातात आहे, त्यांनी त्यावर कारवाई करावी, असं अजितदादा म्हणाले.

लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्यामुळे ज्यांना दोन डोस देण्यात आले आहेत. त्यांना बाहेर पडायला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोलेल. पण लोकांना बाहेर पडण्याची मुभा द्यावी की देऊ नये याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते इथून पुढे 100 ते 120 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवसात लोकांनी नियमावलीचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. सोलापुरातील एका गावात मी गेलो होतो. तेव्हा लोक मास्कशिवाय फिरताना दिसले. अशी बेपर्वाई बरी नाही. एक देखील बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते. त्यामुळे बारकाईने वागण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

लोकसंख्येच्या प्रमाणत लस मिळायला हवी, लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. केंद्राने जुलैमध्ये लस मिळेल असं सांगितलं होतं. पण अजूनही पुरेशी लस मिळालेली नाही, असं सांगतानाच पूर्वी लस घेण्यापासून लोक कचरत होते. आता लोक लस घेऊ लागले आहेत. लोकांची मानसिकता बदलली आहे. ही सकारात्मक बाब आहे, असं त्यांनी सांगितलं.


शेअर करा