राजा कोंबडा मेला म्हणून मालकाला दुःख अनावर आणि ..

शेअर करा

लाडका कोंबडा मेल्यामुळे त्याची अंत्ययात्रा काढत त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली असून कोंबड्यावर प्रेम करणाऱ्या या माणसाच्या दिलदारपणाचे परिसरात कौतुक केले जात आहे. मुखेड तालुक्यातील सावरगाव माळ गावातील हा प्रकार आहे. माळ गावातील शंकर कोकले यांनी कोंबड्याची अंत्ययात्रा काढली आहे.

शंकर कोकले यांनी दहा वर्षांपासून एक कोंबडा पाळला होता. राजा नावाच्या या कोंबड्यावर गावकऱ्यांचे देखील विशेष प्रेम होते. मात्र मांजरीने चावा घेतल्यामुळे हा कोंबडा आजारी पडला. त्यानंतर मालकाने आजारी पडलेल्या कोंबड्यावर उपचार केले. मात्र उपचार करुनही या कोंबड्याचा जीव वाचला नाही आणि अखेर त्याने प्राण सोडला.

दुःखी झालेल्या शंकर कोकले यांनी त्यांच्या आवडत्या अशा राजा या कोंबड्याची वाजतगाजत अंत्ययात्रा काढली. तसेच त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे कोंबड्याच्या या अंत्यविधीला गावातील लोकदेखील मोठ्या संख्येने हजर होते. कोंबड्या सारख्या पक्ष्याची अंत्ययात्रा पहिल्यांदाच या निमित्ताने पहायला मिळाली आहे. एका कोंबड्याची अंत्ययात्रा काढली म्हणून काही लोक हा व्हायरल व्हिडीओ मोठ्या चवीने पाहत आहेत.


शेअर करा