नगर आयटी पार्कच्या ‘ कथित ‘ राड्यावर संग्राम जगताप व किरण काळे म्हणतात की .. ?

शेअर करा

अहमदनगर : अनेक अडचणींवर मात करत नागापूर एमआयडीसीमधील बंद पडलेला आयटी पार्क सुरू केला त्यामुळे स्थानिक तरुणांना देखील रोजगार उपलब्ध होत असून आयटी पार्क बंद पाडण्याचा प्रयत्न काही व्यक्ती करीत आहेत. अशा पद्धतीने भीतीचे वातावरण निर्माण केल्यास नवीन कंपन्या येणार नाहीत, असे आमदार संग्राम जगताप यांनी नगर येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.

संग्राम जगताप म्हणाले की, तत्कालीन उद्योग मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या काळात आयटी पार्क उभारण्यात आला. गेल्या वीस वर्षापासून हा आयटी पार्क बंद होता. इमारतीच्या काचा फुटलेल्या होत्या. फरशी तुटलेली होती, छत गळत होते तर विजेची देखील कुठलीच व्यवस्था नव्हती. 2016 मध्ये आयटी पार्क सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अनेक अडचणींवर मात करत आयटी पार्कचे छोटेसे रोपटे लावल्यानंतर त्यातून विविध उद्योगांची स्टार्ट कंपन्यांची सुरुवात झाली.

मात्र कोरोनाचे संकट आल्यानंतर गेल्या दोन वर्षात अनेक उद्योगधंदे बंद पडले. अनेक जणांचा रोजगार गेला मात्र तरी देखील नगरच्या परिस्थितीत काहीजण आयटी पार्क मध्ये काम करत आहेत. मात्र आठ ते दहा जणांनी आयटी पार्कमध्ये जाऊन दहशत माजवली त्यामुळे तेथे काम करणारे युवक-युवती भयभीत झाले. हा एक प्रकारे आयटी पार्क बंद पाडण्याचा प्रयत्न आहे. नगरची जनता सुज्ञ असून नगरकर काम करणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहतात. पूर्वीसारखे आरोप करून मते मिळवण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत.

आयटी पार्क हे राजकीय व्यासपीठ नाही ज्यांना कुणाला आयटी पार्क मध्ये नवीन कंपन्या आणायचा असतील त्यांनी त्या जरूर आणाव्यात आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. आयटी पार्क शेजारचा इमारतीचा भूखंड देखील आयटीसाठीच राखीव आहे तिथेही आयटी पार्क सुरू करणार आहोत. समाजामध्ये किंमत नसलेले लोक माझ्यावर आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेदेखील संग्राम जगताप पुढे म्हणाले यावेळी गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, शहराध्यक्ष माणिक विधाते आदी उपस्थित होते

किरण काळे काय म्हणाले ?

नागापूर येथील आयटी पार्कची पाहणी करत असताना कोणत्याही महिलेचा विनयभंग शिवीगाळ धक्काबुक्की दमदाटी असे कृत्य आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडून किंवा व्यक्तीकडून झालेले नाही. आयटी पार्क कॉल सेंटर सुरू असून या कॉल सेंटर मध्ये आम्ही जबरदस्तीने प्रवेश केलेला नाही. तिथे काम कर्मचाऱ्यांची हरकत नसल्यामुळेच आम्ही आयटी पार्क मध्ये प्रवेश केला. जर त्यांना काही हरकत असती तर त्यांनी सांगितलेल्या सूचनांचे आम्ही पालन केले असते. त्यांनी आमच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधला. कोणत्याही प्रकारची बाचाबाची झालेली नाही, असे सांगून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आयटीपार्क पाहणीचा व्हिडीओच पत्रकार परिषदेत सादर केला.


शेअर करा