‘ तुमच्या गाडीत हवा कमी दिसतेय ‘, पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस

शेअर करा

लोकांना फसवण्यासाठी भामट्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया ठराविक कालावधीनंतर आणल्या जातात. असाच एक धक्कादायक प्रकार पुणे शहरात सध्या सुरु आहे. पुणे इथे चक्क टायर पंक्चर रॅकेट अगदी बिनबोभाटपणे सुरू असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.सदर प्रकारासंदर्भात नागरीक संघटनांनी आक्षेप नोंदवला असून शहरातील पंक्चर काढणाऱ्या दुकानदारांना नोंदणी बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काय आहे कामाची पद्धत ?

गेल्या ३ वर्षांपासून पुण्याच्या खडकी परिसरामध्ये हा सगळा कारभार सुरू आहे. टायर पंक्चर काढण्याच्या निमित्ताने लोकांना हजारो रुपयांना फसवण्याचा धंदा या टोळक्यानं सुरू केला आहे . काही सजग ग्राहकांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घेत आहेत . हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

सर्वात आधी कारचालक किंवा बाईकस्वाराला या टोळक्यातील लोक गाडी चालवताना त्याच्या चाकामध्ये हवा कमी असल्याचं सांगतात. त्यानंतर पंक्चर असू शकतं, अशी शक्यता सांगून संबंधित आरोपींच्या पंक्चरच्या दुकानाचा पत्ता सांगतात आणि तेथून गायब होतात. जेव्हा संबंधित कारचालक किंवा बाईकस्वार त्या दुकानात जातो, तेव्हा त्याच्या गाडीच्या टायरमध्ये बरेच पंक्चर असल्याचं सांगितले जातात आणि पंक्चर काढण्यासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात . अडकलेला माणूस पैसे देतोय हे लक्षात आल्यावर त्याच्याकडून मोठी वसुली केली जाते .

संदीप शिंदे नावाच्या एका व्यक्तीने खडकी पोलीस स्थानकात अशाच पद्धतीने आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. टायर पंक्चरच्या नावाखाली संदीपकडून ३ हजार रुपये लुटण्यात आले होते. पोलिसांनी ५० वर्षीय फ्रान्सिस सनी अमोलिक आणि त्याचा २८ वर्षीय सहकारी प्रशांत राजू वाघमारे या दोघांना अटक केली असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संदीपच्या बाईकच्या टायरमध्ये २६ पंक्चर असल्याचं सांगून लुटण्यात आले होते.


शेअर करा