ओमिक्रॉनच्या दहशतीने राज्यात नवीन नियमावली लागू..काय आहेत नवीन नियम ?

शेअर करा

गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा राज्य सरकार अलर्ट झालं असून दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंतेत आणखी भर पडलेली पहायला मिळते आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी असं केंद्राने कळवलं असून त्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे .

राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत मॉल, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले असून प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आले आहे.

काय आहे नवीन नियमावली ?

 • रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल.
 • सार्वजनिक अथवा खासगी वाहनात केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. लस नसेल तर प्रवास नाही.
 • महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या ७२ तास आधीचा आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक
 • सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहता येईल.
 • मास्क घातलेला नसेल तर ५०० रुपये दंड
 • दुकानात ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदाराला १० हजार दंड तर मॉलमध्ये कुणी मास्क न घातल्यास मालकाला ५० हजार दंड
 • राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड
 • भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी केवळ २५ टक्के लोकांनाच उपस्थिती
 • टॅक्सी किंवा खासगी वाहनात मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड तसेच वाहन मालकासही ५०० रुपये दंड ठोठावण्यात येईल.
 • किमान ६ फूट अंतर राहील असं सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं.
 • सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई

काय आणि कसा आहे ओमिक्रॉन व्हेरियंट ?

आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन नावाच्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात खळबळ उडाली असून अमेरिकेसह कॅनडा व इतर देशांनी पावले उचलायला सुरुवात केली आहे . भारत देखील ओमिक्रॉनला गांभीर्याने घेत असून मुंबई महापालिकेने ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉन व्हेरियंट बाधित आढळल्यास संबंधित पूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर राज्यात नवीन नियमावली देखील लागू करण्यात आलेली आहे .

जागतिक आरोग्य संघटनेने या नवीन प्रकाराला B.1.1.529 असे म्हटले असून त्याला Omicron असे नाव देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेत या आठवड्यात प्रथमच कोरोनाचा हा नवीन समोर आला असून करोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉन हा नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्ती केली आहे .

ओमिक्रॉन हा अत्यंत वेगाने पसरणारा विषाणू असून पूर्णपणे लसीकरण झालेल्या आणि बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांनाही याचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. इस्रायलमध्ये नव्या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला कोरोनाच्या लसीच्या दोन्ही डोससह तिसरा बूस्टर डोस देण्यात आला होता मात्र तरीही नवीन विषाणूने त्याला गाठले आहे. कोरोनाचा हा नवीन विषाणू डेल्टासह इतर कोणत्याही प्रकारांपेक्षा अतिशय वेगाने पसरतो, असे शास्त्रज्ञांच्या तपासातून समोर आले आहे.

ओमिक्रॉनमध्ये अनेक स्पाइक प्रोटीन म्युटेश (बदल) आहेत आणि तो अत्यंत संसर्गजन्य आहे. ओमिक्रॉन हा ग्रीक शब्द असून दक्षिण आफ्रिकेत जिनोमिक्सचे निरीक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने अलिकडेच एक नवीन प्रकार शोधून काढला आणि त्याला B.1.1.529 असे नाव दिले आणि त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन’ असे या नवीन विषाणूचे नामकरण केले आहे. ओमिक्रॉन हा अधिक अत्यंत संसर्गजन्य आणि रोगप्रतिकारक शक्तीवर वेगाने मात करण्यात कार्यक्षम आहे, असे डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या पथकाचे म्हणणे आहे. कारण बूस्टर डोस घेणाऱ्यांनाही या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.

करोनाच्या नव्या विषाणूचा म्हणजे ओमिक्रॉनचा संसर्ग दक्षिण आफ्रिकेत वेगाने पसरत आहे. यावर डॉक्टर आणि शास्त्रज्ञांची विशेष नजर असून विविध अभ्यास केले जात आहेत. बूस्टर डोसची आश्यकताही व्यक्त केली जात आहे. बूस्टर डोसमुळे लसीची परिणामकारकता लक्षणीयरित्या वाढते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अनेक देशांनी खबरदारी बाळगत प्रवासावर निर्बंध घातले आहेत.


शेअर करा