गुड न्यूज..अखेर राज्य सरकारने ‘ ह्या ‘ निर्णयाचा केला फेरविचार आणि ..

शेअर करा

राज्यावर कोरोना संकट आले असताना कोरोना रोखण्याच्या उपायांचा भाग म्हणून जाहीर केलेल्या नव्या नियमात आता बदल करण्यात आलेला असून व्यायाम शाळा, जिम, ब्युटीपार्लर आणि हेअर सलून सुरू करण्याला राज्य सरकारने रविवारी परवानगी दिली आहे त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या तुलनेत 50 टक्के क्षमतेने जीम आणि सलून हे सुरू राहणार आहेत मात्र इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लसीचे दोन्ही डोस बंधनकारक असून सकाळी दहा ते संध्याकाळी सात या वेळेतच ही सेवा ठेवण्याचे बंधन मात्र घालण्यात आलेले आहे.

कोरोना संसर्ग वाढल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांशी व्यवहारावर मर्यादा आणून त्याच्या अंमलबजावणीसाठी शनिवारी नवीन नियमावली सरकारतर्फे जाहीर करण्यात आली होती त्यात जिम, व्यायाम शाळा, ब्युटी पार्लर आणि सलून पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. या व्यवहारांना काही सवलती असताना या व्यवसायांना पूर्णपणे बंदी नको अशी भूमिका घेत व्यावसायिकांच्या संघटनांनी विरोध केला.

संघटनांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या टप्प्यात देखील आमच्यावर अन्याय झालेला आहे. आमच्या व्यवसायाबाबत सरकार एकतर्फी निर्णय घेऊन ते लादत असल्याचे देखील संघटनांचे म्हणणे होते त्यानंतर सरकारकडून याविषयी फेरविचार करण्यात आला आणि 50 टक्के क्षमतेने हे व्यवसाय सुरू करण्याचे आदेश रविवारी देण्यात आले.

सरकारच्या नवीन आदेशानुसार सदर क्षेत्रात काम करणाऱ्या व्यवसायिक घटकांना दिलासा मिळाला असून कोरोनाविरोधात असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे बंधन मात्र घालण्यात आलेले आहे. नियमाच्याअंतर्गत काम न करणाऱ्या व्यक्तींवर साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देखील सरकारकडून देण्यात आलेला आहे.


शेअर करा