सायबर गुन्हेगारांनी ‘ ही ‘ ट्रीक वापरत अकाउंट झिरो बॅलन्सचं करून टाकलं

शेअर करा

फसवणुकीसाठी गुन्हेगार प्रत्येक वेळी नवीन नवीन फंडा वापरत आणत असतात अशीच एक घटना बीड येथे उघडकीस आली असून अवघ्या चोवीस तासात दोन जणांना सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन गंडा घातलेला आहे. एनी डेस्क (Any Desk) नावाचे एक ॲप या गुन्हेगारांनी समोरील व्यक्तीला डाउनलोड करायला लावले आणि पावणे दोन लाख रुपयांना त्यांना चुना लावला. वडवणी आणि बीड येथे हा प्रकार घडलेला आहे.

पहिल्या घटनेत 21 जानेवारी रोजी गणेश हरीभाऊ जाधव ( राहणार वडवणी ) यांना बजाज फायनान्सच्या कार्डची ईएमआय ऑफर असल्याच्या बहाण्याने विपिन गुप्ता नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला होता त्याने गणेश यांना विश्वासात घेऊन एनी डेस्क नावाचे एक ऐप डाऊनलोड करायला लावले आणि बोलण्यात गुंतवून त्यांच्या खात्यातून अकरा टप्प्यात असे तब्बल 1 लाख 10 हजार रुपये काढून घेतले.

दुसऱ्या घटनेत बीड येथील शिक्षिका असलेल्या अनिता संतराम तांदळे यांना गुगल पे चे लिमिट वाढवण्यासाठी म्हणून एसबीआय कस्टमर केअरचा चुकीचा नंबर त्यांना मिळाला आणि त्यावर कॉल करताच समोरील भामट्यांनी त्यांनादेखील तशाच पद्धतीने एनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करायला लावले आणि दोन टप्प्यात त्यांच्या खात्यातून 74 हजार रुपये लंपास केले त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

सातत्याने सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे करत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. कुठल्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणतेही ॲप डाऊनलोड करू नये तसेच एखाद्या फायनान्स कंपनीकडून किंवा बँकेकडून बोलतो म्हटल्यानंतर तात्काळ विश्वास ठेवू नये. बँक ओटीपी घेण्यासाठी कधीही फोन करत नाहीत त्यामुळे सहसा असा प्रकार आढळल्यास बँकांमध्ये जाऊन खात्री करून घ्यावी, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे .


शेअर करा