‘ कुठूनच न्याय मिळेना ‘, अखेर ‘ त्या ‘ पारधी कुटुंबियांवर आमरण उपोषणाची वेळ

शेअर करा

नगर जिल्ह्यात खडीक्रशरचा व्यवसाय चांगलाच तेजीत असून त्यांच्या या व्यवसायामुळे मात्र परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा अतोनात त्रास होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. अशीच एक घटना पारनेर तालुक्‍यातील रांजणगाव मशीद येथे समोर आलेली असून क्रशरसाठी फोडल्या जात असणाऱ्या खडकांमुळे शेतातील पिकाचे अतोनात नुकसान होत असल्याने एका पारधी समाजाच्या कुटुंबावर कुठेही न्याय मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे.

नगर चौफेर प्रतिनिधीशी बोलताना उपोषणकर्ते खालशा लाईदोर्‍या काळे यांनी सांगितले की, ‘ गेल्या काही महिन्यांपासून आम्ही सरकार दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत मात्र आम्हाला कुठलाही न्याय मिळत नाही. पारनेर तालुक्यात गेल्यानंतर नगर तालुक्याच्या प्रशासनाकडे पाठविण्यात येते तर नगर तालुक्यात आल्यानंतर पारनेरकडे जा असे सांगत टोलवाटोलवी करण्यात येते. पोलिस अधिकाऱ्यांवर देखील या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले असून आमची शिकले-सवरलेली मुले असताना देखील त्यांना एका खोलीत डांबून ठेवत मारहाण आणि धमक्या दिल्या जात असल्याचे देखील म्हटलेले आहे. खालशा काळे यांनी सदर प्रकरणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर देखील नगर तालुका प्रशासनाकडून सहकार्य केले जात नसल्याच्या विरोधात खालशा लाईदोर्‍या काळे यांनी कुटुंबीयासह नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले काय आहे निवेदन ?

मी खालशा काळे व सुरेखा काळे ( दोघेही मुक्काम पोस्ट रांजणगाव मशीद तालुका पारनेर ) येथील रहिवासी असून मी वरील ठिकाणी कायमस्वरूपी रहिवासी असून शेती हा माझा व्यवसाय आहे. आमच्या मालकीचा मौजे रांजणगाव मशीद येथील गट क्रमांक ४८६ असून रांजणगाव मशीद आणि घोसपुरी शिवेलगत आमची मिळकत आहे. प्रविण सदाशिव वाळके व संजीव रावसाहेब नरवडे यांनी मौजे घोसपुरी येथील गट क्रमांक 485 मध्ये स्टोन क्रशर सुरू केलेला आहे. सदर क्रशरसाठी खडक हा फाईटच्या माध्यमातून फोडला जात आहे मात्र त्यामुळे दगड उडून आमच्या शेतामध्ये आणि घरावर येऊन पडत आहेत तसेच आमच्या शेतीमालाचे देखील प्रचंड नुकसान झालेले आहे आणि होत आहे.

त्यांना आम्ही विचारणा केली असता त्यांनी आम्हाला अरेरावीची भाषा वापरली आणि दमबाजी करून म्हणाले ‘ तुम्हाला काय करायचे ते करून घ्या आम्ही कुणाला घाबरत नाही ‘. त्यामुळे सुपा पोलिस स्टेशन येथे याबाबत तक्रार देण्यासाठी गेलो असता सदर पोलीस स्टेशनमधील पोलिस अधिकारी यांनी आमची तक्रार घेण्यास नकार दिला आणि आम्ही प्रांत अधिकारीसाहेब श्रीगोंदा यांच्याकडे सदर व्यक्तीविरुद्ध अर्ज केला .

सदर अर्जानंतर प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयातून वरील इसमांना नोटीस काढण्यात आली होती मात्र तरीसुद्धा सदर इसम हे हजर राहिले नाही उलट आमच्याकडून हे प्रकरण मिटून घेण्यासाठी दमदाटी करून कोऱ्या कागदावर सह्या घेतलेल्या आहेत. सदर इसमाने आमची फसवणूक करून सदरचे प्रकरण महसूल अधिकारी यांना हाताशी धरून मिटवून टाकले मात्र सदर खडी स्टोनक्रशर फाईट मारून स्फोट घडवत असल्याने आमच्या शेतात वारंवार दगड येऊन पडत आहेत त्यामुळे आमच्या कुटुंबाच्या जीवितास देखील धोका निर्माण झालेला आहे. वारंवार तक्रार दाखल करून देखील आमची कुणी दखल घेत नाही आम्ही पारधी समाजाचे असल्याकारणाने आम्हाला तुच्छतेची वागणूक देऊन हिणवले जात आहे.

वरिष्ठांकडून आदेश दिले असताना देखील प्रदीप आव्हाड तहसील कार्यालय अहमदनगर व अभिजित बारवकर नायब तहसीलदार आम्हाला जातिवाचक वागणूक देत असून आमची योग्य ती दखल घेत नाहीत तसेच सतीश पवार तलाठी रांजणगाव मशीद हे जाण्यायेण्यासाठी दहा हजार रुपये व पेट्रोल खर्चाची मागणी करत आहेत तसेच कमिशन देखील मागत आहेत. आम्हाला सगळीकडे तुच्छतेची वागणूक दिली जात असून कुठेही न्याय मिळत नसल्याने आम्ही दहा मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.


शेअर करा