नगर ब्रेकिंग..कोतवाली पोलिसांनी सट्टेबाजांना चक्क पाठलाग करून धरले

शेअर करा

आयपीएल सुरू झाल्यावर नगर शहरात आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आयपीएल सट्टा सुरू असल्याचे वृत्त नगर चौफेरने प्रकाशित केले होते. हा सट्टेबाजार कसा चालतो आणि यात कुठले लोक कार्यरत आहेत आणि कशा पद्धतीने नागरिकांना यात अडकवले जाते हे देखील प्रसिद्ध करण्यात आले होते त्यानंतर नगर शहरात पोलीस दलाने आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत तर सट्टा लावण्यासाठी लागणारी सामग्री जप्त करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, विशाल अश्विनकुमार आनंद ( वय 25 राहणार पटवर्धन चौक अहमदनगर ) , दीपक रमेश शर्मा ( वय 18 सावेडी अहमदनगर ) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत तर अक्षय घोसके आणि मोहन जोशी ( राहणार तारकपूर अहमदनगर ) हे मात्र फरार झाले आहेत.

सदर आरोपी हे मोबाईलवरून आयडी आणि पासवर्ड पाठवून क्रिकेट तसेच बिंगोचा खेळ खेळत आहेत अशी माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी पटवर्धन चौकात सापळा रचला आणि तिथे त्यांचे याबाबतचे बोलणे पोलिसांच्या कानी पडले मात्र पोलिसांची चाहूल लागताच ते दोघे मोपेड गाडीवरून चितळे रोडच्या दिशेने पळायला लागले मात्र पोलिसांनी त्यांना चितळे रोड येथे धरले आणि त्यांचे मोबाईल सर्वात आधी हस्तगत केले.

दीपक शर्मा याच्याकडील मोबाईलच्या व्हाट्सअपवर अक्षय घोसके याच्या जुगाराचा आयडी आणि पासवर्ड मिळाला तर विशाल आनंद याच्याकडील वहीत आयपीएल मॅचबाबतचा ठेवलेला हिशोब देखील आढळून आला त्यानंतर त्यांनी आम्ही आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेतो असे सांगितले आणि हा सट्टा तारकपूर येथे राहणाऱ्या मोहन जोशी याला देतो असे देखील ते म्हणाले.

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र टकले, पोलीस नाईक संतोष गोमसाळे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहोकले, पोलीस कॉन्स्टेबल अतुल काजळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे यांनी ही कारवाई केली आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून जिल्ह्यात ही दुसरी कारवाई असून याआधी पाथर्डी इथे कारवाई करण्यात आली होती. कमी कष्टात जास्त पैसा मिळवण्याच्या आशेने तरुण पिढी याकडे आकृष्ट होत असून त्यामुळे गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेचे प्रमाण देखील वाढले आहे.

नगर शहरात केवळ शहरच नव्हे तर इतर उपनगरांमध्ये देखील छोटेखानी दुकानदारांना कमिशन बेसिसवर या धंद्यात अडकवण्यात आलेले आहे. केवळ एक मोबाईल फोन एवढेच भांडवल आणि परिसरातील तरुणांना आकर्षित करून त्यावर कमिशन कमवायचे अशा पद्धतीने हा व्यवसाय सुरु असून पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नगर शहरात कौतुक करण्यात येत आहे.


शेअर करा